हरळी बुद्रुक येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उदघाटन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हरळी बुद्रुक येथील गडहिंग्लज साखर कारखान्यासमोर माळरानावर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उदघाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे महागाव भागातील महागाव, हरळी बु, हरळी खु, हुनगिनहाळ, वैरागवाडी, हसुरवाडी, हसूरसासागिरी या गावातील ११०१ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, गडहिंग्लज महावितरण कंपनीच्या विभागाचे कार्यकारी अभियंता विजय आडके, गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, महागाव महावितरण उपकेंद्राचे शाखा अभियंता संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, हरळी बुद्रुक येथील सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज मिळणार आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातील सर्व सौर ऊर्जा प्रकल्प लवकर सुरू करा. सध्या शेतकऱ्यांना चार दिवस रात्री व तीन दिवस दिवसा शेतीपंपासाठी वीज मिळत आहे. आता या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना सकाळी साडेनऊ ते पाच या कालावधीत वीज मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतीला पाणी देताना घडणाऱ्या दुर्घटना घडणार नाहीत. तसेच शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
कार्यकारी अभियंता विजय आडके यांनी हरळी बुद्रुक येथील सौर ऊर्जा प्रकल्पापासून निर्माण होणारी वीज महागाव उपकेंद्रात आणून शेती पंपांच्या फिडरला जोडले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.
यावेळी मंडल अधिकारी राजेंद्र तोळे, सरपंच नीलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले, ग्राम महसूल अधिकारी धनश्री पवार, ग्रामपंचायत अधिकारी वैशाली कुरळे,पोलीस पाटील रेणुका परीट, ग्रा.पं. सदस्य बळवंत गुरव, शिरीष हरळीकर, गोडसाखरचे सचिव श्यामराव हरळीकर, अमर कांबळे यांच्यासह ठेकेदार मेघा इंजीनियरिंग कंपनीचे अधिकारी,महावितरण, महसूल, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दृष्टीक्षेपात सौर ऊर्जा प्रकल्प...
हरळी बुद्रुक येथे उभारलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प तीन मेगावॅट क्षमतेचा आहे. या प्रकल्पाची वीज ही ३३/११ केव्ही महागाव उपकेंद्रास जोडण्यात येणार आहे. महागाव उपकेंद्रातून निघणाऱ्या ३ कृषी वाहिनी दिवसा कार्यान्वित होणार आहेत. यामुळे महागाव शेती पंप वाहिनीवरून ६०२, नदीघाट वाहिनी वरून ८५ व हरळी वाहिनीवरून ४१४ अशा एकूण ११०१ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे महागाव, हरळी बु, हरळी खु, हुनगिनहाळ, वैरागवाडी, हसुरवाडी, हसूरसासागिरी, या गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.



