अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सल्ला
महागाव येथील संत गजानन शिक्षण समूहाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उपस्थिती
![]() |
| चिंचेवाडी : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे स्वागत करताना संस्थेचे विश्वस्त डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, तेजस्विनी पाटील- चुयेकर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): "आपण मोठ्या शहरांपासून लांब आहोत असा न्यूनगंड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनात बाळगू नये. कारण मी देखील ग्रामीण भागातूनच आलेली आहे. जेवढे मातीशी जोडलेले असतो तेवढे जास्त आपण खंबीर, चिवट, जिद्दी असतो, कोणत्याही संकटावर फार पटकन मात करू शकतो. त्यामुळे तुम्ही ठरवलंत तर जग जिंकू शकता" असा आत्मविश्वास प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला.
गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथील संत गजानन शिक्षण समूहाच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त आयोजित 'एक्सप्लोर 2025' या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी तिने व्यासपीठावरून समोर उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींशी मनमोकळेपणाने संवाद साधत गप्पागोष्टी केल्या. संस्थापक ॲड. अण्णासाहेब चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
![]() |
| चिंचेवाडी : गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांचा सत्कार करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी. |
गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके व मान्यवरांच्या हस्ते कलाविष्कार कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. 'घुंगराच्या बोलांनी' मराठमोळ्या दिलखेचक लावणीने कलाविष्कार सुरू झाला. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनीनी एकापेक्षा एक नृत्य, गायन, काव्यरचना, एकपात्री नाट्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
![]() |
| चिंचेवाडी : पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचा सत्कार करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी. |
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिनेत्री माळी पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा शहरातल्याप्रमाणे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी संत गजानन शिक्षण समूहाच्या माध्यमातून चव्हाण कुटुंबीय करत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांचे विचार व दूरदृष्टी खूपच चांगली आहे. विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षणातच गुरफटून न ठेवता त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, करिअरसाठी राबविले जाणारे येथील उपक्रम फारच चांगले आहेत. विद्यार्थी शालेय शिक्षण खूप चांगले घेतात मात्र जेव्हा बोलण्याची, ऑडिशनची वेळ येते तेव्हा आपली मुले कमी पडतात, ही उणीव भरून काढण्यासाठी संत गजानन शिक्षण समूह सतत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये 'स्टेज डेरिंग' निर्माण करते व आपल्या गावातील मुले-मुली ही कुठल्याही पद्धतीने मागे पडू नयेत यासाठी शहरी वातावरणाप्रमाणेच विविध सोयी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देतात ही बाब कौतुक करण्यासारखी आहे. आपण पुणे, मुंबई पेक्षा लांब आहोत अशातला भाग नाही, उलट माझा विश्वास आहे की जेवढा आपण मातीशी जोडलेले असतो तेवढे जास्त आपण खंबीर, चिवट व जिद्दी असतो. त्यामुळे संकटावर आपण फार पटकन मात करू शकतो. मी स्वतः देखील ग्रामीण भागातून आलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड मनात न बाळगता आपली वाटचाल सुरू ठेवल्यास नक्की जग जिंकता येईल असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी त्यांनी स्टेजवरून समोर उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.
![]() |
| चिंचेवाडी : संत गजानन महाराज शिक्षण समूहाच्या चव्हाण कुटुंबीयांसमवेत अभिनेत्री प्राजक्ता माळी. |
कार्यक्रमास तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, उपनिरीक्षक विजय घाटगे, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, ॲड. बाळासाहेब चव्हाण, आगारप्रमुख गुरुनाथ रणे, बाळकू शिंदे, शशिकांत पाटील- चुयेकर, तेजस्विनी पाटील-चुयेकर, युवराज बरगे, नागेश चौगुले, महेश सलवादे, संतोष चिकोडे, सुनील गुरव, सुधीर उर्फ आप्पा शिवणे यांच्यासह प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य नियोजक म्हणून प्रा. अमरसिंह फराक्टे, डॉ. अजिंक्य चव्हाण, प्रा.शिरीष गणाचारी, प्रा. केतन प्रसादी, प्रा. प्रीती पाटील, प्रा. अचला नारायणकर, प्रा. स्वप्निल हराळे, प्रा. जंगली यांनी काम पाहिले. आभार प्रा. कल्याणी चव्हाण यांनी मानले.






