तेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धा
बेळगावचा मानस स्पोर्टस उपविजेता; युनायटेड तृतीय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आंतर अकादमी तेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या चॅम्पियन अकादमीने बेळगावच्या मानसस्पोर्टसचा टायब्रेकवर ४-२ असे नमवून विजेतेपद पटकाविले. यजमान गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कुलने स्थानिक सॉकर ट्रेनिंग सेंटरचा २-० असा पराजय करून तृतीय क्रमांक मिळविला. येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या.
अंतिम अटीतटीच्या सामन्यात चॅम्पियन अकादमी आणि मानस स्पोर्टस संघानीआक्रमक खेळ केला. पण, अचुकते अभावी निर्धारित वेळेत गोलकोंडी फोडण्यात यश मिळाले नाही. पंच ओमकार सुतार यांनी निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब केला. यात कोल्हापूरच्या सोहम माळी, शुभांकर भाटे, आर्यन पवार, अनुज कातवरे यांनी तर बेळगावच्या आराध्या नाकाडे, आरखान बडेगार यांनाच गोल नोंदविता आला. कोल्हापूरचा गोलरक्षक वीर पाटील तीन पेनल्टीचे फटके अडवत विजयाचा शिल्पकार ठरला. त्यामुळे कोल्हापूरने ४-२ अशी बाजी मारली. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल स्कूलने सॉकर ट्रेनिंग सेंटरचा २-० असा पराभव केला. युनायटेडच्या अभिषेक सासनेने दोन गोल मारले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वीर पाटील (कोल्हापूर), आर्या कंग्राळकर (बेळगाव ), शुभांकर भाटे, ओम कुराडे (कोल्हापूर ) यांचा गौरव करण्यात आला.
डॉ. ऋषभ कासार, प्राचार्य संजय कुंभार यांच्याहस्ते विजेते आणि उप विजेत्यांचा गौरव झाला. प्रशिक्षक दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी युनायटेडचे उपाध्यक्ष सुरेश कोळकी, पंडितराव जोशी, विनायक शिंदे, अशोक मगदूम, तानाजी देवेकर, स्पर्धा समन्वयक प्रसाद पवार यांच्यासह पालक, खेळाडू उपस्थित होते. ललित शिंदे यांनी आभार मानले.



