तेरणी ग्रामपंचायतीच्या वतीने आगार प्रमुख गुरुनाथ रणे यांना निवेदन
नरेवाडी, मनवाड मार्गे कळविकट्टे, हत्तरगी पर्यंत देखील बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी, बुगडीकट्टी मार्गावर सायंकाळी साडेपाच वाजता एसटी बस सुरू करण्यात यावी तसेच नरेवाडी, मनवाड, तेरणी मार्गे कळविकट्टे व हत्तरगी या दोन गावापर्यंत एसटी बसेस सकाळी व संध्याकाळी सुरू कराव्यात अशी मागणी तेरणी ग्रामपंचायतीच्या वतीने गडहिंग्लजचे आगार प्रमुख गुरुनाथ रणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनातून म्हटले आहे की, तेरणी गाव हे गडहिंग्लज तालुक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. बस प्रवासाने गडहिंग्लजहून तेरणीला येण्यास तासाभराचा वेळ लागतो. तेरणीला येण्यासाठी गडहिंग्लज आगारातून सायंकाळी साडेचार वाजताची बुगडीकट्टी बस गेल्यानंतर थेट सायंकाळी सात वाजताच बस आहे. त्यामुळे तब्बल अडीच तास प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. परिणामी गावी पोहोचण्यास वेळ होत आहे. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजता गडहिंग्लज ते बुगडीकट्टी बस सुरु करावे अशी मागणी केली आहे.
नरेवाडी, मनमाड मार्गे कळविकट्टे, हत्तरगी पर्यंत बसफेऱ्या सुरू करा
तेरणी गावची लोकसंख्या सहा हजार इतकी असून गावामध्ये दर रविवारी मोठ्या प्रमाणात आठवडी बाजार भरत आहे. या बाजाराला पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने येतात. मात्र नरेवाडी, मनवाड, कळविकट्टे, कर्नाटकातील हत्तरगी या मार्गावर बसफेऱ्या कमी असल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यास अडचण होत आहे. त्यामुळे गडहिंग्लज, नरेवाडी, मनवाड, तेरणी, कळवीकट्टे व गडहिंग्लज, नरेवाडी, मनवाड, तेरणी, हत्तरगी या दोन्ही मार्गांवर सकाळी व संध्याकाळी बसफेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
यावेळी सरपंच रमेश पुजेरी, माजी सरपंच व विद्यमान सदस्य मोसिम मुल्ला, बाळासाहेब निंबाळकर, सुरेश कतीगार, किरण चौगुले, सिद्धाप्पा धनगर, अब्दुलरहमान ताहसिलदार, राजू संती उपस्थित होते.


