अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या हस्ते ई बाईक देऊन गौरव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे विद्यार्थ्यांसाठी 'एक्सप्लोर 2025' हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला होता. यामध्ये अंतिम फेरीतून आयुर्वेद महाविद्यालयाचा साबील शेख मिस्टर एस.जी. एम, तर इंजीनियरिंगची कादंबरी गुरव हिला मिस एस.जी.एम. पुरस्कार देण्यात आला. तृतीय क्रमांकाचा मानकरी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा सुशील नाईक ठरला. ३८०० विद्यार्थ्यांमधून यांची निवड झाली. परीक्षक म्हणून अभिनेत्री प्राजक्ता माळी व रामेश्वर पळसकर यांनी काम पाहिले.
एकूण पाच फेऱ्यांमधून विजेत्यांची निवड झाली. पहिले तीन फेरी कॉलेज स्तरावर झाल्या. यामध्ये विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य, कला, नृत्य, नवकल्पना, सुप्त गुण, सामान्य ज्ञान,संवाद, टॅलेंट शो सारख्या कौशल्याची चाचपणी करून चौथ्या फेरी साठी ३० तर अंतिम फेरीसाठी एकूण १४ विद्यार्थ्यांची निवड झाली.
यातील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पर्यावरण पूरक असे इ बाईक, मुकुट प्रदान करण्यात आले. तृतीय क्रमांकाला लॅपटॉप व इतर सहभागी सर्व स्पर्धकांना विविध भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री माळी यांच्या सोबत झालेल्या रॅम्प वॉकला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. दरम्यान, विद्यार्थ्यांनी कार्यक्रमानिमित्त आयोजित डी.जे.नाईट मधून हिंदी मराठी गीतांचा तालावर ठेका धरत मनमुराद जल्लोष करून आनंद लुटला.

