Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यातील पाचवा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

हरळी बुद्रुक मधील ३ मेगावॅटच्या प्रकल्पातून ११०१ शेतकऱ्यांना दिवसा वीज




कोल्हापूर :  ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही शेतकऱ्यांच्या हिताची असून यामुळे शेतीकरिता दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा झाल्याने शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुखकर होणार आहे, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले. हरळी बुद्रुक (ता.गडहिंग्लज) येथील ३ मेगावॅट सौर प्रकल्प कार्यान्वय कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. या प्रकल्पातून ११०१ शेतकऱ्यांना शेती करिता दिवसा वीज पुरवठा होणार आहे.




यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित शेतकरी यांच्यासोबत संवाद साधला व उपस्थित अधिकाऱ्यांना उर्वरित सर्व प्रकल्प गुणवत्तापूर्ण व जलद गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश दिले. याप्रसंगी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय आडके, उपकार्यकारी अभियंता नागेश बसरीकट्टी, सहायक अभियंता संदीप पाटील, तहसीलदार ऋषिकेत शेळके, तहसीलदार राजेश चव्हाण, मंडल अधिकारी राजेंद्र तोळे, सरपंच निलम कांबळे, उपसरपंच बाजीराव गोरुले, जनमित्र  व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




हरळी बुद्रुक (ता.गडहिंग्लज) हा प्रकल्प ३३/११ केव्ही महागाव उपकेंद्रास जोडण्यात आला आहे. या उपकेंद्रातून निघणाऱ्या महागाव कृषी वाहिनीवरून ६०२, नदीघाट कृषी वाहिनीवरून ८५ व हरळी कृषी वाहिनीवरून ४१४ अशा एकूण ११०१ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे तीन कृषी वाहिनीवरील महागाव, हरळी बुद्रुक, हरळी खुर्द, हुनगिनहाळ, वैरागवाडी, हसुरवाडी, हसूर सासागिरी, या गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे.




जिल्ह्यात एकूण पाच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, ६३५० शेतकऱ्यांना लाभ


हरळीबुद्रुक (ता.गडहिंग्लज) या प्रकल्पासह कोल्हापूर जिल्ह्यात एकूण पाच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या पाच प्रकल्पातून जिल्ह्यातील ६३५० शेतकऱ्यांना शेतीकरिता दिवसा वीज उपलब्ध होत आहे. यामध्ये हरळी बुद्रुक (ता.गडहिंग्लज) प्रकल्पातून ११०१, आळते (ता. हातकणंगले) प्रकल्पातून १९१९, सातवे (ता.पन्हाळा) प्रकल्पातून १३२४, किणी (ता. हातकणंगले) प्रकल्पातून १२१६ व हरोली (ता. शिरोळ) प्रकल्पातून ७९० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात ५३ प्रकल्प प्रस्तावित



मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५३ ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांची एकूण स्थापित क्षमता १७० मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ४८ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे.



मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, भूमी अभिलेख कार्यालय व पोलीस प्रशासन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हात भार लागणार आहे. तसेच या प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रकल्प सुरु झाल्यापासून पहिले तीन वर्षे पाच लाख अनुदान देण्यात येत आहे. उपलब्ध जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी संबधित ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.