आमदार सचिन अहिर यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारचे वेधले लक्ष
या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्यांचीच चौकशीचा प्रकार : आमदार अहिर
वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाईचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन
शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या पाठपुराव्याची दखल
मुंबई : गडहिंग्लज उपविभागातील वाढत्या अवैध धंद्यांबाबत आज विधान परिषदेत आमदार सचिन अहिर यांनी जोरदार चर्चा घडवून आणली. गडहिंग्लज उपविभागाला अवैध धंद्यातून मुक्त करणार का? संवाद देखील आमदार अहिर यांनी करत या प्रश्नाकडे लक्ष वेधले. या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे ठाकरे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांचीच चौकशी करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी उचलून धरली. याची दखल घेत गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी या अवैध धंद्यांविरोधात वेळोवेळी आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर दखल घेतली गेल्याने प्रा. शिंत्रे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. गडहिंग्लज उपविभागातील अवैध धंद्यांची विधानसभा अधिवेशन पटलावर चर्चा झाल्याने याबाबत कोणती कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आज विधान परिषदेत आमदार सचिन अहिर यांनी गडहिंग्लज शहर व उपविभागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा मुद्दा केला. ते म्हणाले, गडहिंग्लज हे एक सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. मात्र सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. आतापर्यंत यावर केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता या भागात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सिद्ध होते. करमणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या क्लबमध्ये मटका जुगार अड्डे चालविले जातात. या ठिकाणी 'मिनी कॅसिनो'च सुरू होत आहेत, ही बाब महाराष्ट्राला शोभनीय नाही. कर्नाटक व गोवा या राज्यांना लागूनच गडहिंग्लज शहराची हद्द आहे. गोव्यात दारू स्वस्त मिळत असल्याने ट्रकच्या ट्रकने या ठिकाणी दारू आणून कॅफे व लॉजेसना पुरवली जाते. या विरोधात आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवरच कारवाई करण्याचा प्रयत्न पोलीस करतायेत. या विभागातील प्रा. सुनील शिंत्रे यांनी या अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवून कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून देखील कारवाई करण्याऐवजी उलट प्रा. शिंत्रे यांचीच चौकशी केली गेली. त्यामुळे या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून या अवैध धंद्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार आहिर यांनी यावेळी केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई : गृह राज्यमंत्री
यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, गडहिंग्लज उपविभागातील अवैध धंद्याबाबत केलेल्या तक्रारींची दखल घेऊन यावर कारवाई केली जाईल. या विभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता, येथील गुन्हेगारी कमी करण्याकरिता काय विशेष मोहीम राबविता येईल याबाबत एक बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.


