तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी काल रात्री काढले आदेश
दोन दिवसापासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथे सुरू असणारे सात खडी क्रशर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिले आहेत. या क्रशरमुळे मानवी व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून शेतीसह चारा पाण्याचे देखील मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांनी जनावरांसह हलकर्णी ग्रामपंचायत व मंडल अधिकारी कार्यालयासमोर दोन दिवस आंदोलन केले. हे सर्व क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याची त्यांनी मागणी केली आहे. काल रात्री उशिरा तहसीलदारांनी हे सर्व क्रशर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, तत्पूर्वी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी क्रशर परिसरातील घरे व शेती या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या.
हलकर्णी येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारपासून हे आंदोलन सुरू केले होते. शुक्रवारी सायंकाळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी आंदोलन स्थळी भेट देत चर्चा केली. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आम्ही मेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला. क्रशर साठी केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंगमुळे आमची घरे पडली, क्रशर मधून निघणाऱ्या धुळीमुळे जनावरांचा चारा खराब होत असल्यामुळे जनावरे हा चारा खात नाहीत, वयोवृद्ध व लहान मुलांना धुळीमुळे विविध आजार जडत आहेत. या परिसरातील बोरवेलच्या पाण्याला देखील याचा फटका बसत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ कागदी घोडे न नाचवता हे क्रशर कायमस्वरूपी बंद करण्याची गरज आहे याकडे सर्व शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या संदर्भात गडहिंग्लज येथे मंगळवारी (दि. ११) क्रशर मालकांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली आहे, या बैठकीस शेतकऱ्यांना उपस्थित राहावे असे सांगितले. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे आंदोलन स्थगित करावे असे आवाहन केले.
मात्र ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यानंतर सायंकाळी उशिरा तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी आदेश काढले. प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडील याबाबतचा अहवाल अजून प्राप्त व्हावयाचा आहे. त्यामुळे या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता हलकर्णी परिसरातील सर्व क्रशर पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले. या आदेशाची प्रत मंडल अधिकारी विजय कामत यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर काल रात्री हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
यावेळी मंडल अधिकारी विजय कामत, पोलीस उपनिरीक्षक विजय घाटगे, सामाजिक कार्यकर्ते डॉ गंगाधर व्हसकोटी, राजगोंडा पाटील, आप्पासाहेब पोवार, शेखर देसाई, लकाप्पा बसर्गे, राजकुमार पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. दोन दिवस सुरू असलेल्या या आंदोलनस्थळी गडहिंग्लजचे पोलीस उपनिरीक्षक विजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





