Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत शेतकऱ्यांनी बांधली ग्रामपंचायत व मंडल अधिकारी कार्यालय आवारात जनावरे

गावच्या हद्दीत बेसुमार खडी क्रशरमुळे शेतकऱ्यांचे जीवन होत आहे उध्वस्त 


संतप्त शेतकऱ्यांनी जनावरांसह घराबाहेर पडत दोन्ही कार्यालयासमोर मारलाय ठिय्या 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी गावच्या हद्दीतील सर्व खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह ग्रामपंचायत व मंडल अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.  न्याय मिळाल्याशिवाय आम्ही जनावरे घरात बांधणार नाही असा पवित्रा सर्व शेतकऱ्यांनी घेतला. दुपारनंतर सुरू केलेले हे आंदोलन अजून सुरूच आहे.



गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी गावच्या हद्दीत बेसुमार खडी क्रशर दिवस-रात्र सुरु आहेत. क्रशर मधून निघणाऱ्या धुळीचा मानवी आरोग्यावर तसेच शेत पिकांवर मोठा विपरीत परिणाम होत आहे. धुळीने जनावरांचा चारा देखील खराब होत असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. हा चारा घातल्याने जनावरे सतत आजारी पडत असून काही जनावरे देखील दगावली आहेत. 



या खडी क्रशरसाठी मोठ्या प्रमाणात  भुसुंरूग घातले जात असल्याने  विहिरी व बोअरवेल देखील बंद पडलेले आहेत. धुळीमुळे लहान मुले व वयोवृद्धांना श्वसनाचे विकार निर्माण होत आहेत. खडी क्रशरसाठी अवजड वाहनांचा वापर होत असल्याने शेतीचे पाणंद रस्ते देखील पुर्णपणे खराब झाले आहेत. या खडी क्रशरमुळे शेतकऱ्यांना शेती करणे मुश्किल झाले असून नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. येथील शेतकरी हे अल्पभूधारक असून शेतीवरच त्यांचे जीवनमान अवलंबून आहे. २६ जानेवारी रोजी गावसभेत हे खडी क्रशर बंद करण्याचा निर्णय होऊन देखील कारवाई होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या घरातील जनावरांसह हलकर्णी ग्रामपंचायत व मंडल अधिकारी कार्यालयावर धडक देत ठिय्या मांडला आहे.



आंदोलनात राजगोंडा पाटील, उत्तम खानापुरे, आप्पासाहेब पोवार, संजय धनगर, शामराव धनगर, शेखर देसाई, रामू शेरवी, महेश मुंगुरवाडे, बिराप्पा धनगर, तिप्पांना शेरवी रामगोंडा रामाजगोळ, अशोक धनगर, अण्णाप्पा धनगर, शिवानंद धनगर, निंगाप्पा धनगर, अण्णाप्पा चौगुले, उमेश धनगर यांच्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.