Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरातील भुयारी गटार व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी 300 कोटींचा निधी उपलब्ध व्हावा!

भाजपा अभियंता सेलचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांची केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे मागणी 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरात भुयारी गटार योजना व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी तीनशे कोटी निधीची आवश्यकता आहे त्यामुळे हा निधी मंजूर व्हावा अशी मागणी भाजपा अभियंता सेलचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल कट्टर व केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे केली आहे. 



गडहिंग्लज शहराची हद्दवाढ झालेली आहे. याचे अंदाजे क्षेत्र 6 चौरस किलोमीटर आहे. पण शहरासाठी कोणताही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही. खुल्या गटारीचे व जुन्या लेंडुरीचे अस्वच्छ पाणी थेट हिरण्यकेशी नदीत मिसळते. सदर अस्वच्छ पाणी हिरण्यकेशी नदीकाठावरील पुर्वेकडील दुंडगे, हेब्बाळ, निलजी , नुल, मुत्नाळ, हिटणी, खणदाळ, नांगनूर, कडलगे, अरळगुंडी या गावांना पोहचते. त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. या गावच्या ग्रामपंचायतीनी महाराष्ट्र राज्य व केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. या प्रकल्पासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी देखील पालिकेला या संदर्भातील प्रकल्प अहवाल तयार करून देण्यात यावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडून निधी उपलब्ध झाल्यास हा प्रश्न मार्गी लागणार आहे.



गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढ विकास आराखड्यात या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी आरक्षणे दाखविली आहेत. याकरिता तीनशे कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. सदर निधी केंद्राच्या मार्फत उपलब्ध झाल्यास हा प्रकल्प राबविण्याचा मार्ग मोकळा होईल. जागा उपलब्ध असून देखील निधी अभावी शक्य होत नाही.  याकडे श्री. सावंत यांनी लक्ष वेधले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.