आजरा (हसन तकीलदार ): सकाळपासून वाढलेला उष्मा आणि अंगाची होणारी लाही लाही यापासून आजरेकर अक्षरशः त्रस्त झाले होते. परंतु काल दुपारी नभ दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसहीत गारांचा पाऊस सुरु झाला. पाऊणतास पावसाने गारासहित झोडपून काढले. या गारपिटीने आंबा व काजू पिकांचे नुकसान झाले आहे.
गेली चार -पाच दिवस पावसाचे वातावरण तयार होत होते परंतु पाऊस हुलकावणी देत होता. वाढलेल्या उष्म्यामुळे आजरेकर अक्षरशः हैराण झाले होते. परंतु दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यांसह आणि गडगडाटासह गारांचा पाऊस पडला. अर्ध्या पाऊण तासात सर्वत्र पाणीच पाणी झाले. नवीन पाणी पाईप लाईनची खुदाई तसेच काही कॉलनी मध्ये गटारी तुंबल्यामुळे आणि अपूर्ण असल्यामुळे गटारींचे पाणी रस्त्यावर आले. आणि ज्याठिकाणी खोदकाम झाले आहे तेथे चिखलाचे साम्राज्य झाले होते. जमिनीवर पांढऱ्याशुभ्र गारांचे अच्छादन बालचमुना आकर्षित करू लागले. त्यामुळे लहान मुले-मुली हातात वाट्या घेऊन गारा गोळा करत आनंद लुटला.
मोठ मोठ्या धडाधड पडणाऱ्या गारामुळे आंबा, पेरू, काजूच्या झाडावरची फळे तुटून पडली. त्यामुळे काहींचे नुकसान झाले. परंतु ऊस पिकासाठी या पावसामुळे फायदा झाला. यामुळे ऊस पीक जोमात वाढणार. दुपारी गेलेली वीज वीजकर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे रात्री आठ सव्वा आठ वाजता आली. पाऊस पडला असला तरी रात्री हवेत उष्मा आणि उकाडा जाणवत मात्र होता.



