हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केले धुमधडाक्यात स्वागत
गडहिंग्लज (प्रतिनिधी): माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि गोकुळ दूध संघाचे संचालक, कागल पंचायत समितीचे माजी सभापती अंबरिश घाटगे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष तथा महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवेश झाला. त्याबद्दल आज भाजपच्या कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात त्यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व प्रमाणपत्र बहाल करून हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने मोठ्या धुमधडाक्यात सहर्ष स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजपाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रदेश निमंत्रित सदस्य संग्रामसिंह कुपेकर, कोल्हापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महाराष्ट्र प्रदेश अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत सावंत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, गडहिंग्लज मंडल अध्यक्ष प्रितम कापसे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा प्रा. अनिता चौगुले, विस्तारक संदिप नाथबुवा यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संजयबाबा व अंबरिशजी व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेशाने भाजपला हजार हत्तींचे बळ आल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगून त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांचा भाजपात योग्य तो सन्मान राखला जाईल असे सांगितले. तर संजयबाबांनी भाजपात कोणताही स्वार्थ ठेवून प्रवेश केला नसून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाने प्रभावित होऊन प्रवेश केल्याचे सांगितले. यावेळी जिल्ह्यातील एकुण नवनिर्वाचित 18 मंडल अध्यक्षांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

