ठाकरे शिवसेनेकडून आजरा साखर कारखान्याला निवेदन
आजरा (हसन तकीलदार ): आजरा तालुक्याचे वैभव असलेल्या आजरा कारखान्याला भरपूर संकटांचा सामना करावा लागला परंतु या संकटावर मात करीत कारखाना सुरु आहे. यावर्षी कारखान्याला एन. सी. डी. सी. कडून 122 कोटीचे कर्ज मंजूर झाल्यामुळे पुन्हा अशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे सभासदांना साखर व कामगारांना पूर्ण पगार द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी आजरा कारखान्याला एन. सी. डी सी. कडून 122 कोटीचे कर्ज मंजूर झाले आहे. त्याबद्दल चेअरमन आणि संचालकांचे अभिनंदन. या कर्जातून कारखान्यासाठी आपल्याकडून योग्य नियोजन व्हावे. या अगोदर कारखाना दोन वर्षे बंद होता नंतर कारखाना सुरु करताना कामगारांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत 50टक्के पगारावर काम करण्याचा प्रस्ताव मान्य केला आणि कामगारांनी 50 टक्के पगार कपातीला मान्यता देऊन टप्प्या टप्प्याने पगार वाढ घेण्याचा निर्णय घेतला गेला. कामगारांच्या त्या पगार कपातीचा करार संपला आहे, त्यामुळे कामगारांना पूर्ण पगार देण्यात यावा त्याच बरोबर सभासदांना व ऊस उत्पादकांना सवलतीच्या दरात लवकरात लवकर साखर द्यावी ज्यामुळे सभासद, ऊस उत्पादक सभासद व कर्मचारी यांच्यामध्ये कारखान्याबद्दल समाधानाचे वातावरण निर्माण होईल जेणेकरून पुढील गाळप हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप करून उद्दिष्ट पूर्ती करण्यात मदत होईल.
निवेदनावर शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार, शिवआरोग्य तालुका प्रमुख दयानंद भोपळे, शिवसेना उबाठा उपतालुका प्रमुख शिवाजीराव आढाव, शिवसेना उपतालुका संघटक हरिश्चंद्र व्हरकटे यांच्या सह्या आहेत.

