बहुजन मुक्ती पार्टीचे आजरा तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
आजरा (हसन तकीलदार): नुकतेच संकेश्वर बांदा महामार्गावरील संकेश्वर ते आंबोली येथील रस्त्याचे कामकाज पूर्ण झालेले आहे. सदर महामार्ग हा संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा व आंबोली या शहरांना जोडत असल्यामुळे येथील आजूबाजूच्या गावांमध्ये नागरिक या रस्त्याचा वापर करत असतात. सदर रस्ता हा गोव्याला जाणारा सर्वाधिक जवळचा व सोयीचा रस्ता असल्यामुळे पर्यटक सुद्धा याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची गती व संख्या जास्त असते. याशिवाय लगतच्या खेड्यांमधून महामार्गावर येणाऱ्या लोकांची सुद्धा संख्या तितकीच जास्त आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर अनेक ठिकाणी काही अपघातप्रवण क्षेत्र निर्माण झालेली आहेत. ज्या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. विशेष करून गावांना जोडणाऱ्या जोड रस्त्यांच्या ठिकाणी अनेकदा अपघात होत आहेत. सदर ठिकाणी काही उपाययोजना करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. याकडे बहुजन मुक्ती पार्टीने आजरा तहसीलदार कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हा मार्ग पूर्वी राज्य मार्ग होता, नुकताच याला राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित करण्यात आलेले आहे. या मार्गावर यापूर्वीही मोठी वाहतूक सुरू होतीच, त्याचीही गती चांगलीच होती परंतु त्यापेक्षाही जास्त गतीसाठी हा राष्ट्रीय महामार्ग बनवण्यात आलेला आहे. परंतु त्याची योग्य ती काळजी घेणे, त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. याशिवाय या रस्त्याला टोल आकारणी सुद्धा करण्याचा मानस सरकारचा आहे. मग “पैसे देऊन मृत्यू विकत घ्यायचा का?” असा प्रश्न जनसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रश्नावरती लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे. सदर महामार्गावर कोणत्या उपाययोजना करता येतील याबद्दल बहुजन मुक्ती पार्टीकडेही काही संकल्पना आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी किरण के. के, डॉ. सुदाम हरेर, अमित सुळेकर, काशिनाथ मोरे, डॉ. उल्हास त्रिरत्ने, द्वारका कांबळे यांच्यासह बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.



