Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवाजी विद्यापीठचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने हा प्रस्ताव संमत करण्यात यावा


भाजप अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी





कोल्हापूर : कोल्हापूर येथील "शिवाजी विद्यापीठ" या नावामध्ये  छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपूर्ण व एकेरी उल्लेख असल्याने विद्यापीठाचे नाव अधिक सन्माननीय आणि पूर्ण स्वरूपात "छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ" ( CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ UNIVERSITY)असे करण्यात यावे अशी मागणी भाजप अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रातून केली आहे. 



महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील महान योद्धा, आदर्श राज्यकर्ता, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि लोककल्याणकारी विचारांचे अध्वर्यू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्याअस्मितेचे व अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा अपूर्ण आणि एकेरी उल्लेख करणे हा त्यांच्या महान कार्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अवमानच करण्यासारखे आहे.


कायदेशीर व प्रशासकीय आधार


महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, 2016 कलम 3 (8): विद्यापीठाच्या नावात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनास आहे. कलम 4: शैक्षणिक संस्थांनी सामाजिक व ऐतिहासिक वारसा जपणे आवश्यक आहे.


शासनाने यापूर्वी घेतलेले ऐतिहासिक निर्णय -


1996 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस चे नामकरण छत्रपती शिवाजी टर्मिनस करण्यात आले.


• 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा संपूर्ण नावाचा उल्लेख करण्यात आला.


• याच धर्तीवर शिवाजी विद्यापीठाचे नावही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करणे आवश्यक आहे.


• छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ असे केले.


• पूर्वी औरंगाबाद चे संभाजीनगर असे नामकरण केले होते. आता छत्रपती संभाजीनगर केले आहे. 





संपूर्ण नावाचा वापर करण्याचा कायदेशीर आधार -


• महाराष्ट्र शासनाने यापूर्वीच विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव वापरण्याचा निर्णय घेतला आहे.


• शासकीय दस्तऐवज, स्मारके, विमानतळ, रेल्वे स्थानके इत्यादींच्या नावांमध्ये त्यांचा पूर्ण उल्लेख केला जातो.


• असे असताना, एका प्रमुख शिक्षणसंस्थेच्या नावात त्यांचा अपूर्ण व एकेरी उल्लेख योग्य नाही.


 सार्वजनिक भावनांचा आदर -


• महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या एकेरी नावामुळे खंत, तसेच संताप वाटतो.


• भारतातील अन्य विद्यापीठांची नावेही संपूर्ण स्वरूपात असतात, उदा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ इत्यादी. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण होणे आवश्यक आहे.



समाजमनातील स्थान -


• छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण भारताचे राष्ट्रपुरुष  आहेत.


• त्यांच्या नावाचा अपमान होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी शासनाने सुधारणा केल्या आहेत.


1962 साली दक्षिण महाराष्ट्रात विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा प्राचार्य एस्. आर्. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव सुचवले होते. मात्र त्या वेळी शिवाजी विद्यापीठ हे संक्षिप्त नाव ठेवण्याचा आग्रह धरला गेला. त्या काळातील सामाजिक व प्रशासकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास, संक्षिप्त नाव ठेवण्याचा निर्णय तात्कालिक असू शकतो; परंतु आता समाजातील जनभावना, ऐतिहासिक महत्त्व आणि शासनाच्या आताच्या निर्णयांची दिशा लक्षात घेऊन हा बदल आवश्यक आहे. यापूर्वी अनेक ऐतिहासिक संस्थांची नावे सुधारली गेली आहेत. व्हिक्टोरिया टर्मिनसचे  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तसेच औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर, उसन्मानाबाद चे धाराशीव,  अशी नावे बदलण्यात आली आहेत. त्यामुळे पूर्वीचा निर्णय अंतिम असू शकत नाही. त्या वेळेची कारणे आजही ग्राह्य धरता येणार नाहीत. छत्रपती ही पदवी म्हणजे केवळ राजा नव्हे, तर हिंदवी स्वराज्य संस्थापक, लोककल्याणकारी शासक आणि स्वराज्याचे संरक्षक यांचे प्रतीक आहे. त्यांच्या नावाचा संपूर्ण उल्लेखच योग्य सन्मान देईल.


या पत्रातून केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे 


शिवाजी विद्यापीठचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीने हा प्रस्ताव संमत करण्यात यावा.


सर्व शासकीय दस्तऐवज, अधिसूचना व प्रमाणपत्रांमध्ये त्वरित सुधारणा करावी.


महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा संपूर्ण उल्लेख करण्यासाठी त्वरित योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी या पत्रातून चंद्रकांत सावंत यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.