गिजवणे येथे दूध उत्पादक लढा परिषदेत विविध ठराव
दूध उत्पादक शेतकऱ्यांवरील अन्याया विरोधात लढाई : कॉम्रेड संग्राम सावंत
गडहिंग्लज (प्रतिनिधी): सहकार चळवळीला लागलेली कीड दूर करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांची चळवळ उभी करण्याची गरज आहे. उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी (योग्य व वाजवी हमीभाव) मिळाले पाहिजे. दूधाची फॅट तपासणारी यंत्रणा महाराष्ट्रात नसून याची सुरुवात आता करण्याची आवश्यकता आहे. दुधाला मिळणाऱ्या रिबेटसाठी व दूध व्यवसायाच्या खासगीकरणा विरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा लढा उभारावा लागेल असे मत अखिल भारतीय किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दुध उत्पादकांच्या लढा परिषदेत व्यक्त केले.
गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे येथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांची लढा परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड देशमुख बोलत होते. या परिषदेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पाहार घालून व क्रांतीची ज्योत पेटवून झाले करण्यात आले. या परिषदेत विविध ठराव करण्यात आले.
या परिषदेची भूमिका मांडताना मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत म्हणाले, ही लढाई व्यक्ती विरोधात नसून भ्रष्टाचार व दूध उत्पादक शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आहे. या लढाईची सुरुवात आम्ही गिजवणे येथून करत आहोत. भविष्यात दूध उत्पादकांच्या हितासाठी पुकारलेला हा लढा लढून जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ.सुभाष जाधव, ॲड. दशरथ दळवी, कॉम्रेड अमोल नाईक, संजय घाटगे, संदीप भोगण, समीर खेडेकर यांनी परिषदेला मार्गदर्शन केले. गिजवणे गावातील दूध उत्पादक शेतकरी चंद्रकांत कडूकर, जनार्दन तोडकर, स्वप्निल कोरी, सागर शिंदे यांनी यांनी आपल्या मनोगतामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. या परिषदेला आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, कागल तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविका गणेश कळेकर यांनी तर सूत्रसंचालन रामचंद्र कुराडे यांनी केले. आभार महांतेश बन्ने यांनी मानले.


