खडी क्रशर बंद कृती समितीतर्फे मंडल अधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील पाणंद रस्त्यांमधून वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी क्रेशर बंद कृती समितीतर्फे मंडल अधिकारी विजय कामत यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, हलकर्णी येथील महावितरणच्या कार्यालयालगत दक्षिणेकडील धनगर वसाहतीकडे पाणंद रस्ता आहे. यापूर्वी खडी क्रशरच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यावरून शालेय विद्यार्थी शाळेला सायकलीवरून ये- जा करत असतात. तसेच शेती कामे करण्यासाठी बैलगाडी जाण्या येण्यासाठी हा पाणंद रस्ता आहे. मात्र या रस्त्यावरून अवजड वाहनांच्या बेकायदेशीर वाहतूकी मुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. या रस्त्याच्या खालून शेतीचे व पिण्याच्या पाण्याचे ग्रामपंचायतीचे पाईपलाईन देखील गेलेले आहेत. मात्र अवजड वाहतुकीमुळे या पाईपलाईनला देखील गळती निर्माण झाली आहे. या रस्त्यावरून होत खडी वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या अवजड वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर राजगोंडा पाटील, उत्तम खानापुरे, शेखर देसाई, आप्पासाहेब पोवार, लकाप्पा बसर्गे, संजय धनगर, राजू धनगर, राजू चाळूगोळ, रामा धनगर, सिद्धाप्पा धनगर, अण्णाप्पा धनगर आदींच्या सह्या आहेत.


