कोल्हापुरातील दक्षिण विभाग कार्यालय गडहिंग्लजला स्थलांतर करण्याप्रश्नी ठाकरे शिवसेनेचा इशारा
गडहिंग्लजला प्रांताधिकारी यांना निवेदन ; १० मे पर्यंतचा 'अल्टिमेटम'

गडहिंग्लज: प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देताना ठाकरे शिवसेना पक्षाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर पाटबंधारेचे दक्षिण विभाग कार्यालय गडहिंग्लज येथे स्थलांतरित करण्याबाबतचा निर्णय १० मे पर्यंत न झाल्यास गडहिंग्लज येथील पाटबंधारे विभागाच्या विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) हे कार्यालय कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यामुळे या विभागातील चार तालुक्यातील शेतकऱ्यांना १०० किमी अंतरावरील कोल्हापूरला हेलपाटे मारावे लागतात ही अडचण आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन दक्षिण विभागाचे कार्यालय तातडीने गडहिंग्लजला स्थलांतरीत करावे अशा मागणीचे निवेदन शिवसेनेने यापूर्वीच दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे उपअधिक्षक अभियंता संजय पाटील यांनी याबाबत मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे यांना सविस्तर दोन पानी पत्र पाठवून शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नाही. गडहिंग्लजला विभागीय कार्यालय आहे. त्यामार्फत दक्षिण विभागाच्या कार्यालयाकडे शेतकऱ्यांच्या अडचणी येत असतात. त्याची सोडवणूक केली जाते. शेतकऱ्यांची कोणतीही अडचण होत नाही. असा संतापजनक निष्कर्ष काढला आहे. एवढेच नव्हे तर कोल्हापूर मुख्यालयात मंत्र्यांच्या होणाऱ्या बैठका आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समन्वय बैठका यांना हजर राहण्यासाठी कोल्हापूर येथेच कार्यालय असणे योग्य आहे असे समर्थन केले आहे.
गेल्या दहा वर्षांत या विभागाच्या शेतकऱ्यांची सातत्याने कोंडी होत आलेली आहे. विभागीय कार्यालय हे मध्यस्थाच्या भूमिकेत आहे. शेतकऱ्यांकडून आलेले निवेदन कोल्हापूर कार्यालयाला पाठविणे असेच या कार्यालयाच्या कामाचे स्वरूप आहे. कोणताही निर्णय या कार्यालयात होत नाही. सर्वच निर्णय दक्षिण विभाग कार्यालयात होत असतात. या परिस्थितीत उपअधिक्षक अभियंता यांनी दिलेला खुलासा शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेणारा आहे. कोल्हापूर मुख्यालय सोडण्याची अधिकाऱ्यांची तयारी नाही, हेच यामागचे कारण आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोल्हापूरात बसणारे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर कितीवेळा गेले? याचे उत्तर त्या कार्यालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे. शिवसेनेने केलेल्या मागणीचा गांभिर्याने विचार न करता घाई घाईत खुलासा करून आपण कोल्हापूर सोडणार नाही. असाच अधिकाऱ्यांचा सूर दिसतो. याकडे या निवेदनातून लक्ष वेधले आहे. अधिकाऱ्यांच्या खुलाशावर विसंबून न राहता. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधावा. त्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करावी आणि त्यानंतरच याबाबत निर्णय व्हावा. दक्षिण विभागाचे कार्यालय अधिकाऱ्यांच्या खुलाशाचा न विचार करता तत्काळ गडहिंग्लजला हलवावे. १० मे पर्यंत हा निर्णय झाला नाही तर येथील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील या निवेदनातून जिल्हाप्रमुख प्रा. शिंत्रे यांनी दिला आहे.
