Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत खडी क्रशर विरोधात शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरूच

ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली आंदोलक शेतकऱ्यांची भेट 


न्याय न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा दिला इशारा 



हलकर्णी: आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करताना ठाकरे शिवसेना पक्षाचे गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीपराव माने, युवा सेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील व इतर पदाधिकारी.


गडहिंग्लज (प्रतिनिधी):  हलकर्णी व चंदनकुड हद्दीत सुरू असलेले सर्व खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करावेत यासाठी येथील शेतकऱ्यांनी गुरुवारपासून आपल्या जनावरांसह भर उन्हात बेमुदत उपोषण सुरू केले असून आज सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन कायम होते. या खडी क्रशरमुळे हजारो एकर शेती तर उध्वस्त होत असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी अंगाला मीठ चोळून आम्ही जनावरांसमोर झोपायचे का? असा संतप्त सवाल शासनाला केला आहे. दरम्यान, आज शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख दिलीपराव माने, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अवधूत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांना दिलासा दिला व योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.



या ठिकाणी सुरू असलेल्या सात खडी क्रशरमुळे शेती, विविध पाण्याचे स्त्रोत, मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. चाऱ्यावर देखील धुळीचा थर साचल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या खडी क्रशर विरोधात गेले दहा-बारा वर्ष येथील शेतकरी संघर्ष करीत आहेत. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने दिनांक १७ एप्रिल पासून हलकर्णी बस स्टँड चौकात क्रशर बंद कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आपल्या घरातील सर्व जनावरांसह भर उन्हात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरू होते.



आतापर्यंत या आंदोलनाला जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बसवराज मत्नाळे, जिल्हा सरचिटणीस सुभाष पाटील, फुलाजी खैरे, आप्पासाहेब जाधव, आप्पासाहेब चौडाज, मुक्ती संघर्ष समिती राज्याध्यक्ष संग्राम सावंत, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर विटेकरी यांनी पाठिंबा दर्शिवला आहे. दरम्यान, गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेत चर्चा केली. क्रशर बंद कृती समितीचे अध्यक्ष राजगोंडा पाटील यांच्या अपघात प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संशयीतांवर  कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षकांकडे केली. याबाबत तपास सुरू असून निष्पन्न झाल्यास कारवाई करण्याचे आश्वास पोलीस निरीक्षक श्री. सिंदकर यांनी दिले.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.