ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय ; यात्रेची तयारी सुरू
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत व पंचक्रोशीतील श्रद्धास्थान श्री करनाईक देवाची वार्षिक यात्रा दिनांक २१ मे रोजी करण्याचा निर्णय नुकतेच ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.
यंदा पंचक्रोशीतील बुगडीकट्टी, नौकुड, तसेच भडगाव या गावांच्या महालक्ष्मी यात्रा देखील मे महिन्यातच पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पै पाहुणे, नातेवाईक व ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये या सर्व बाबींचा विचार करून यावेळी यात्रा २१ मे रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेची तारीख निश्चित झाल्याने ग्रामस्थ यात्रेच्या तयारीला लागल्याचे चित्र गावात दिसत आहे.
मंदिर परिसर सुशोभीकरणामुळे यंदा भाविकांचा आनंद द्विगुणित होणार
श्री करनाईक मंदिराच्या सभोवताली पेविंग ब्लॉक बसविण्यासाठी माजी आमदार राजेश पाटील यांनी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे. तर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मंदिरासमोर कायमस्वरूपी आरसीसी मंडपची उभारणी करण्यात आली असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे यात्रेत मंदिराभोवती दंडवत घालण्यासाठी भाविकांना सुखदायी वातावरण निर्माण होणार आहे.






