आजरा अन्याय निवारण समितीचे उपविभागीय अधिकारी व नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन
आजरा (हसन तकीलदार ): आजरा शहरात व उपनगरात कोट्यवधीच्या पाणी योजनेचे काम सुरु आहे. परंतु या कामामध्ये सातत्य, नियोजन व दर्जा याचा आभाव दिसून येत असल्यामुळे या कामाच्या दर्जाची तपासणी करून अहवाल सादर करावा याबाबत अन्याय निवारण समितीने उपविभागीय अधिकारी व नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
मागील सालापासून जवळजवळ अंदाजे दोन वर्षे आजरा शहर व उपनगराला पाणी पुरवठा याजनेचे काम सुरु आहे. अद्याप हे काम अपूर्ण असून या कामाचा दर्जा योग्य नसून कामात सतत्यताही दिसून येत नाही. या अगोदर दि. 21/01/2025 व 05/03/2025 रोजी याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याच प्रमाणे मोर्चा काढून जाब विचारण्यात आला होता तेव्हा सदर योजना 20/03/2025 पर्यंत पूर्ण होऊन कार्यन्वयित होईल असे लेखी पत्र देण्यात आले होते. परंतु सदर काम आज अखेर पूर्ण झालेले नाही. सुरु असलेल्या कामात फारच त्रुटी दिसून येत आहेत आणि या सर्व त्रुटी अन्याय निवारण समितीने निदर्शनास आणून देण्याचे काम केले होते. परंतु यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे म्हटले आहे. या कामाचा दर्जा तपासण्यात यावा याबाबत उपविभागीय अधिकारी आजरा भुदरगड उपविभाग गारगोटी यांनाही ज्ञात करण्यात आले होते. त्यानुसार याबाबत प्रशासकांनी याचा अहवाल देणेबाबत सूचित केले होते परंतु याबाबत अद्याप नगरपंचायतीने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्याचप्रमाणे सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेची मुदत किती? व दिलेली पहिली मुदतवाढ कोणत्या तारखेपर्यंत आहे. व ती मुदतवाढ का दिलेली आहे? तसेच मुदतीत काम पूर्ण न झालेस ठेकेदारावर कोणती कारवाई करणार याचीही माहिती या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
शहरात सुरु असलेल्या गटर व रस्त्याच्या कामाच्या सिमेंट काँक्रिटची नमुने घेऊन तपासणी झालेली नसल्याचे म्हटले आहे. कामे सुरु असताना नगरपंचयतीचा कोणताही कर्मचारी उपस्थित नसलेने ही कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत असा आरोपही करण्यात आला आहे. तेव्हा या सर्व बाबींची तपासणी करून अहवाल सादर करावा असे या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, सचिव पांडुरंग सावरतकर, सल्लागार समिती सेक्रेटरी वाय. बी. चव्हाण, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष जावेद पठाण, सल्लागार समिती उपाध्यक्ष जोतिबा आजगेकर, संतोष बांदिवडेकर, बंडोपंत चव्हाण, संतोष शेवाळे, संजय जोशी, सादिक नेसरीकर, निलेश घाटगे आदींच्या सह्या आहेत.


