मुकुंददादा आजरा साखर कारखान्याला वैभव प्राप्त करून देतील : नौशादभाई बुडडेखान
आजरा (हसन तकीलदार ) : आजरा साखर कारखान्याच्या चेअरमन पदी राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका प्रमुख, जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नौशादभाई बुडडेखान यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
आजऱ्याचे वैभव असलेले वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना अनेक अडचणीवर मात करीत मार्गक्रमण करीत आहे. मागील काळात कारखान्याला गाळप उद्दिष्ट साध्य झाले नसल्याने कारखान्यावरील वाढता कर्जाचा बोजा त्याचप्रमाणे ऊसाची कमी उपलब्धता यामुळे कारखाना चालवणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. तरी सुद्धा माजी चेअरमन वसंतराव धुरे यांच्या राजीनाम्यानंतर हे शिवधनुष्य पेलणार कोण हा मोठा प्रश्न होता. शेवटी जिल्ह्याच्या वरिष्ठ नेत्यांनी मुकुंददादांवर विश्वास दाखवत चेअरमनपदी बिनविरोध निवड केली.
प्रादेशिक साखर संचालक जी. जी. मावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही बिनविरोध निवड करण्यात आली. यनिमित्ताने कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष नौशादभाई बुडडेखान व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते मुकुंददादा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नौशादभाई म्हणाले की, दादांचे कार्य निःस्वार्थ आहे. त्यांच्या संयमी, धोरणी, अनुभवी आणि अभ्यासूवृतीचा कारखान्याला नक्कीच फायदा होणार आहे. कारखान्याचे अध्यक्षपद जरी काटेरी मुकुट वाटत असले तरी त्यांच्या सहकारातील असलेल्या दीर्घ अनुभवाचा योग्य वापर होणार आहे. ज्याप्रमाणे त्यांनी जनता बँकेला उर्जीतावस्था प्राप्त करून दिली आहे त्याच प्रमाणे कारखान्यालाही उर्जीतावस्था प्राप्त करून देतील अशी खात्री आहे. दादांचा आणखीन एक कौशल्य म्हणजे की ते कामगारांचे कौशल्य हेरून त्या कामगारांच्याकडून संस्थेच्या हितासाठी त्याचा वापर करून घेतात. त्यामुळे कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देतील यात शंका नाही.
मुकुंददादा म्हणाले की, मला काही धोरणात्मक निर्णय घेताना कारखान्याच्या हितासाठी वेळप्रसंगी कटू निर्णयही घ्यावे लागतील यासाठी मला सर्वांची साथ हवी. 'लढेंगे और जितेंगे' असेही त्यांनी यावेळी म्हटले. कार्यक्षेत्रात ऊस वाढीसाठी प्रयत्न करणे, सभासदांनी जो हजारो रुपये भागभडवल गुंतवला आहे त्यासाठी त्यांना सवलतीच्या दरात साखर देणे, कामगारांचे प्रश्न, गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणे याकडे लक्ष केंद्रित करून कारखान्याचा कारभार कमीत कमी खर्चात करून कर्ज कमी कसे करता येईल यासाठी प्रयत्न प्रामुख्याने करावे लागतील.
या प्रसंगी जवाहर पतसंस्थेचे चेअरमन इकबाल शेख, शिवसेना उबाठाचे रेहान तकीलदार, न्यामत वंटमुरे, कैयुम बुडडेखान, फारुख मुजावर, समीर बुडडेखान, इकबाल मालदार, प्रशांत गजरे, मोहसीन बुडडेखान, आशपाक तकीलदार, जावेद पठाण, सुफियान खेडेकर, आर्षद बुडडेखान, आशपाक माणगावकर, बैजू तकीलदार आदिजण उपस्थित होते.



