Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा येथील माद्याळ फाट्याजवळ झालेल्या बाईक रायडर अपघातातील हेल्मेट कॅमेऱ्यातील फुटेज पोलिसांच्या हाती

अपघाताचे नेमके कारण आणि वेग तपासणार : आजरा पोलीस 




आजरा (हसन तकीलदार ): आजरा-आंबोली राष्ट्रीय महामार्गावर माद्याळ तिट्यानजिक रविवार दि. 20 रोजी झालेल्या दुचाकी आणि कारच्या अपघातातील दुचाकीस्वार सिद्धेश विलास रेडेकर (वय 23 रा. माळी कॉलनी टाकाळा )याच्या हेल्मेट कॅमेऱ्याचे फुटेज आजरा पोलिसांच्या हाती लागले आहेत. फुटेजची तपासणी सुरु असून त्यातून अपघात नेमका कसा झाला याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

    

संकेश्वर -बांदा महामार्ग आता काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट ठरत आहे. असे ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.





भरधाव दुचाकीने कारला धडक दिल्यानंतर बाईक रायडर सिद्धेश रेडेकर याच्या डोक्यावरील 70हजार रुपये किमतीचे हेल्मेट फुटून त्यावरील कॅमेरा तुटून पडला होता. पंचनाम्याच्या वेळी आजरा पोलिसांना सिद्धेशचे फक्त हेल्मेट मिळाले होते. कॅमेरा मात्र मिळाला नव्हता. पोलिसांनी रविवारी सायंकाळी पुन्हा घटनास्थळी जाऊन शोध मोहीम राबवली त्यावेळी रस्त्याकडेला एका बाजूला पडलेला कॅमेरा पोलिसांना सापडला. तज्ञाच्या मदतीने कॅमेऱ्यातील फुटेज तपासून दुचाकीचा वेग तसेच अपघात नेमका कसा झाला याचेही कारण समोर येईल अशी माहिती आजरा पोलीस ठाण्याचे सहाय्य्क निरीक्षक नागेश यमगर यांनी सांगितले.

 

या अगोदरही या महामार्गावर अपघात होऊन काहींनी आपले तरुण मुले आणि घरचे कर्ते कमवते पुरुष गमावले आहेत. प्रशस्त रस्ता असल्यामुळे वाहनांचा वेग वाढला आहे. सुसाट जाणाऱ्या वाहनामुळे धोकादायक वळणावर आणि तिट्ट्यावर वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे अपघात कमी करण्यासाठी उपाय योजना कराव्यात असा पत्रव्यवहार या अगोदर आजरा अन्याय निवारण समितीने केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून ब्लॅक स्पॉट ठरवून त्याठिकाणी योग्य उपाय योजना करणेसाठी सांगणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा महामार्ग काही गावातून जात असल्यामुळे ठराविक ठिकाणी वेग मर्यादा ठेवणे गरजेचे असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मासेवाडी,ऐनापूर, साळगाव, सुलगाव, पारेवाडी, हाळोली,देवर्डे माद्याळ, गवसे आदी ठिकाणी गावातून येणारे व रस्त्यावरून सुसाट जाणारे यामुळे अपघात होत आहेत असेही म्हटले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.