Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजऱ्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याची गरज

सामाजिक कार्यकर्ते डॉ. रोहन जाधव यांचे मत





आजरा (हसन तकीलदार) : आजरा गावाचे ऐतिहासिक संदर्भ अगदी शिलाहार काळापासून दिसून येतात. मध्यंतरी फर्ग्युसन कॉलेज मधील एका विद्यार्थीनी ने अगदी येथे अश्मयुगातील शस्त्रे ही शोधली होती. निसर्गाने समृद्ध हा परिसर तरी ही ऐतिहासिक वास्तु तशा आपल्याला कमीच लाभलेत. आजरा तालुक्यात फारच मोजक्या ऐतिहासिक वास्तू आहेत परंतु आज या ऐतिहासिक वास्तूंचे पतन होताना दिसत आहेत. यासाठी या वास्तूंचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज आहे असे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. रोहन जाधव यांनी आपले मत मांडले आहे.



यावेळी बोलताना डॉ. रोहन जाधव म्हणाले, रामतीर्थ येथील मंदिरे, व्यंकटराव हायस्कूल , जुने कोर्ट, जुनी तहसील व पोलीस स्टेशनची इमारत आणि  काही हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या वास्तू सोडल्या तर तसा ऐतिहासिक वारसा कमीच लाभला आहे. त्यात  रामतीर्थच्या जंगालात असणारी छोटी गढी (चौकी) आशा काही वास्तू फक्त पुस्तकात नोंदी पुरत्याच उरल्या आहेत.




अशापैकी एक 1886 पासून साधारण 136 वर्षां पेक्षा  जास्त वर्ष नैसर्गिक आणि अलीकडील मानवी आघात सोसत जोमाने उभा असलेले, प्रत्येक आजरेकराच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलेले, अनेकांच्या बालपणीच्या आठवणी तेवत ठेवणारे ऐतिहासिक 'व्हिक्टोरिया पूल' आज मात्र सरकारी अनास्थेचा व दुर्लक्षाचा बळी पडून असहाय्य होउन शेवटच्या घटका मोजत आहे.


पुलावरील रस्त्याचा दोन्ही बाजुला करवंदी,सगुणी आणि काटेरी वनस्पती सारख्या  झाडाझुडपांचे साम्राज्य झाले आहे. काही ठिकाणी पिंपळ आणि शिशम सारखी झाडे उगवली आहेत ज्यांची मुळे आत जाऊन पुलाचे आयुष्य कमी करीत आहेत.  इतक्या वाईट अवस्थेत असून ही आपल्या येथील प्रशासकीय अधिकारी याची जबाबदारी एकमेकांवर ढकला ढकली  करून आपले हात वर करीत कानाडोळा करीत आहेत. लोकप्रतिनिधींचे लक्ष ना अधिकाऱ्यांचे. त्यामुळे हे पूल हळूहळू घटका मोजताना दिसत आहे.



आज हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाकडे कडे हस्तांतरीत झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याची देखभाल व डागडुगी सोडून दिली आहे आणि नॅशनल हायवे ॲथॉरिटी कडून खासगी कंपनीला हायवेचा ठेका मिळाल्यामुळे हे काम करायचे कोणी हा प्रश्न आ वासून उभा आहे. कारण कंपनीने पर्यायी पूल बांधल्यामुळे ते त्याची देखभाल करणार नाहीत हे नक्कीच. पाश्चिमात्य देशांच्या सारखा ऐतिहासिक वास्तू जपण्याचा दृष्टीकोण आपल्याकडे नसला तरी किंवा काही कारणांमुळे जुना पुल सांभाळने शक्य नसले तरी गरज सरो वैद्य मरो असे  करून चालणार नाही.




सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, आमदार, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, बांधकाम विभागाचे आधिकारी, नॅशनल हायवे ॲथोरीटीचे आधिकारी, संबंधित कंपनीचे आधिकारी आणि सुज्ञ नागरिकांनी याचे गांभीर्य ओळखून योग्य पावले उचलावित. तसे आदेश द्यावेत आणि यावर उचित उपाययोजना आखणे गरजेचे आहे. केवळ व्हिक्टोरिया पुलच नव्हे तर व्यंकटराव हायस्कुलची जुनी इमारत, आजरा तहसील व पुलिस स्टेशनची जुनी इमारत अशा ज्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जुन्या ऐतिहासिक ब्रिटिश कालीन वास्तू आहे त्यांचे संवर्धन करून त्या जतन करणे गरजेचे आहे. पुरातत्व खात्याने याकडे लक्ष घालून या पुलाच्या दोन्ही बाजूने बगीचा करून पुलावर आकर्षक विद्युत रोषणाई केली तर आजऱ्याच्या प्रवेशद्वाराची शोभा वाढेल. आजरेवासियांना विरंगुळ्यासाठी एक उद्यान होईल आणि निसर्गाच्या सौंदर्याचा लाभ घेता येईल. ग्रीस सारख्या देशात अर्काडिको ब्रिजला जसे संवर्धन केले आहे त्या धर्तीवर विक्टोरिया पुलाचे संवर्धन करणे गरजेचे आहे पुलाच्या कठडयावरील घडीव दगड चोरीला गेले आहेत अशी चर्चा सुरु होती त्याचा छडा लावणे गरजेचे आहे. त्यामुळे पुरातत्व खाते, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधिनी याकडे लक्ष द्यावे व योजना आखून या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.