मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश
संपूर्ण देशावर पसरली शोककळा
अहमदाबाद : गुजरात मधील अहमदाबाद येथे लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 242 प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा देखील समावेश आहे. या दुर्घटनेने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.
एअर इंडियाचे बोईंग 787 हे प्रवासी विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते. उड्डाणानंतर अवघ्या पाचच मिनिटात हे विमान नागरी वस्तीवर कोसळले. या विमानात एकूण 230 प्रवासी, दोन चालक आणि दहा कर्मचारी असे मिळून एकूण 242 जण प्रवास करत होते. या विमानाच्या मुख्य चालकाने दुर्घटना टाळण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत अथक प्रयत्न केले, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने त्यांचे प्रयत्न वाया गेले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स बचाव कार्यावेळी हाती लागला असून यातील माहिती पाहिल्यानंतरच अपघात नेमका कशामुळे झाला याचा उलगडा होणार आहे. या विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटन, 1 कॅनडा व 7 पोर्तुगालचे प्रवासी प्रवास करत होते.

