चव्हाण फायटर्स उपविजेता; इफा लायन्स तिसरा
![]() |
| गडहिंग्लज : डेव्हलपमेंट फुटबॉल लीग विजेत्या युनायटेड रायझिंग स्टार्सला पारितोषिक देताना दिग्विजय कुराडे. सोबत पंकज देसाई, महादेव शिवारे, अरूण पाटील, अशोक कुरबेट्टी आदी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): रंगतदार झालेल्या अंतिम फुटबॉल सामन्यात युनायटेड रायझिंग स्टार्सने (कै.) अभिजित चव्हाण फायटर्सला २-१ असे नमवुन शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीगचे विजेतेपदासह रोख पंधरा हजार रुपयांचे पारितोषिक पटकाविले. अंतिम सामन्यात दोन गोल मारणारा युनायटेड रायझिंगचा कर्णधार समर्थ यादवने मालीकावीराचा मानकरी ठरला. इफा लायन्सने गुफा गार्डीयन्सला टायब्रेकरवर २-० असे हरवून तिसरा क्रमांक मिळविला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विदया संकुलामार्फत गेले पाच दिवस एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू होती.
शिवराजचे प्राचार्य एस.एम .कदम यांच्याहस्ते अंतिम सामन्याची सुरवात झाली. पाचव्या मिनिटाला रायझिंग स्टार्सच्या सौरभ शिंदे याचा फटका फायटर्सच्या गोलरक्षकाने अडविला. सोळाव्या मिनिटाला समर्थ यादवने अनपेक्षितपणे मैदानी गोल करून श्रीगणेशा केला. फायटर्सच्या जीत फुटाणकरने २२ व्या मिनिटाला सोपी संधी दवडल्याने मध्यतरापंर्यत रायझिंग स्टार्सची १-० अशी आघाडी टिकली . उत्तरार्धातही रायझिंग स्टार्सने वर्चस्व राखत चौफेर खेळ केला. ३३ व्या मिनिटाला युवराज बिलावरने दिलेल्या क्रॉसपासवर समर्थ यादवने उत्कृष्ट फटक्याव्दारे गोल करून संघाची २-० अशी आघाडी वाढवली. ४५ व्या मिनिटाला चव्हाण फायटर्सच्या जीत फुटाणकरने टाकलेल्या क्रॉसपासवर आलोक पाटीलने हेडव्दारे चेंडू मारून गोलजाळी भेदत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला फायटर्सने फ्रिकीकचे गोलमध्ये रुपांतर न केल्याने बरोबरीची संधी दवडली. उर्वरित वेळेत रायझिंगने भक्कम बचाव करून २-१ असे विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत इफा लायन्सने गुफा गार्डियन्सवर टायब्रेकरवर २-० अशी मात करून बाजी मारली. निर्धारित वेळेत सामना ०-० असा बरोबरीत होता. शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, युनायटेडचे संभाजी शिवारे, पंकज देसाई यांच्याहस्ते विजेत्या आणि उपविजेत्यांचा गौरव झाला. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला. अशोक कुरबेट्टी, अरूण पाटील, महादेव पाटील, सचिन फुटाणकर, अभिजित देसाई, प्रा. शिवाज पारळे यांनी उत्कष्ठ खेळाडूसह समन्वयक प्रसन्न प्रसादी, सुरज कोंडूस्कर यांचा सत्कार केला. यावेळी मनिष कोले, प्रशातं दड्डीकर, सौरभ पाटील, सौरभ जाधव, यासीन नदाफ, सागर पोवार उपस्थित होते. ललित शिंदे यांनी आभार मानले.
उत्कष्ट खेळाडू...
स्पर्धावीर - समर्थ यादव ( युनायटेड रायझिंग)
गोलरक्षक- पवन गुंठे ( युनायटेड रायझिंग)
बचावपटू- अवधूत चव्हाण ( युनायटेड रायझिंग)
मध्यरक्षक- पुथ्वी गायकवाड ( युनायटेड रायझिंग)
आघाडीपटू - जीत फुटाणकर ( चव्हाण फायटर्स)
उद्योन्मुख- धीरज कुरबेट्टी ( इफा लायन्स)




