नागरिकांच्या हाकेला मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांचा प्रतिसाद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहर व उपनगरातील विविध रस्ते, गटारी, पाणी यासह विविध समस्या सोडवण्यावर मनसेने भर दिला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी नागरिकांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यात आघाडी घेतली आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले हे सर्वसामान्य व गोरगरीब, कष्टकरी कामगार, विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे एक आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. कोणतेही प्रश्न असोत आक्रमकपणे आंदोलन करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. सध्या गडहिंग्लज शहरातील धोकादायक होर्डिंगचा प्रश्न असो किंवा रस्ते, पाणी, गटारी यासह विविध प्रश्नात लक्ष घालून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न नागेश चौगुले करीत आहेत. नुकतेच त्यांनी केडीसीसी कॉलनी येथील नळपाणी पाईपलाईन रस्त्याचे काम, भडगाव रोडवरील देवगोंडा कॉलनी येथील रस्त्याची दुरुस्ती हे प्रश्न नगरपालिकेचे लक्ष वेधून करून घेतले आहेत. दरम्यान आज डॉक्टर कॉलनी माणिक बाग रिंग रोड येथील रस्ता, गटारी यांची साफसफाई याबाबत येथील नागरिकांची कैफियत ऐकली. त्यांनी तातडीने नगरपालिका व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांचे याकडे लक्ष वेधले. याबाबत सोमवारी तातडीने ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सध्या शहरात मनसेने नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर देत असल्याचे चित्र दिसत आहे.



