Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'शक्तीपीठ महामार्ग' गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातून जाऊ देणार नाही!

गडहिंग्लज येथील विविध पक्ष- संघटनांच्या बैठकीत निर्धार 


शक्तीपीठ महामार्गविरोधातील आंदोलन यापुढे तीव्र करण्याचा निर्णय 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातील  गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तालुक्यातून कदापी जाऊ देणार नाही. या विरोधात यापुढे लढा तीव्र करण्यात येणार असून प्रसंगी रक्त देखील सांडू पण हा महामार्ग होऊ देणार नाही. असा इशारा गडहिंग्लज येथे झालेल्या विविध पक्ष संघटनांच्या  बैठकीत देण्यात आला. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी सर्वांनी शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला. 



शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी हा महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून जावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर याला विरोध दर्शविण्यासाठी आज ही बैठक पार पडली. आमदार पाटील यांनी केलेली ही मागणी व्यवहार्य नसून बालिश आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी व नागरिक हा त्यांचा प्रयत्न उधळून लावतील अशा भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. शक्तीपीठ महामार्ग विरोधातील या लढ्यात केवळ जमिनींचा प्रश्न नाही तर या रस्त्यामुळे या विभागातील चार नद्या ओलांडून जावे लागते. या महामार्गामुळे नद्यांचे प्रवाह खंडित होणार असून महापुरासारखी गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. हा रस्ता जेथून गोव्यात उतरणार आहे तो सर्व भाग 'इको सेन्सिटिव्ह झोन' मध्ये आहे. त्यामुळे तेथील जंगल देखील उद्ध्वस्त होणार असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचणार आहे, त्यामुळे काहीही झाले तरी शक्तिपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून होवू देणार नाही अशी भूमिका उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली. यावेळी 'गडहिंग्लज, आजरा चंदगडमध्ये शक्तीपीठ महामार्ग आणणाऱ्या नादान सरकारचा धिक्कार असो, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे आदी घोषणा देण्यात आल्या.



यावेळी बैठकीचा हेतू स्पष्ट करताना  कॉम्रेड संपत देसाई म्हणाले, येथील शेतकरी व नागरिकांनी आपल्या जमिनी, नद्या व जंगले जीवापाड जपलेली आहेत. या संपदेवर कोण जर हल्ला करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे हा लढा तीव्र करणार आहे.



या बैठकीस शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, वसंत नाईक, श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयसिंग चव्हाण, अभय देसाई, जनता दलाच्या प्रा. स्वाती कोरी, बाळेश नाईक, भाजपचे संग्रामसिंह कुपेकर, बळीराजा संघटनेचे नितीन पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.