कोल्हापूरात महादरबार हॉल येथे वीर वंदना सशस्त्र दल माजी सैनिक उपक्रम संपन्न
कोल्हापूर : सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमातासाठी संपर्क अभियान आयोजित केले असून या उपक्रमातून माजी सैनिकांच्या अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी सवर्तोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही रेकॉर्ड्स आणि कमांडंट, रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटर विशिष्ट सेवा पदक, अधिकारी ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती यांनी दिली.
महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा, कोल्हापूर येथे जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता यांच्यासाठी संपर्क अभियान आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त), रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनिअर ग्रुप, खडकीचे कर्नल मुळचंद गुजर, सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी सुभाष बाबू डोंगरे, लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील, मेजर ज्ञानेश्वर मोरे रेकॉर्ड ऑफिस BEG तर्फे उपस्थित होते.
ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती म्हणाले, आपण सर्वांनी देशासाठी सेवा दिली आहे. आपल्या सेवा काळात विविध अडचणींना सामोरे गेला आहात. आपल्या सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. आपण सर्वांनी देशसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले. देशाप्रती कार्य, आपण दिलेले योगदान हे बहुमुल्य आहेत. त्याची ही परतफेड करण्यासाठी या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला सेवा देण्याची संधी आम्हाला मिळाली असून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या या उपक्रमांतून नक्कीच पूर्ण करु, असे सांगितले. तसेच स्पर्श पोर्टलच्या माध्यमातून आपण आपल्या समस्या सादर कराव्यात त्याही आम्ही पूर्ण करु. माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रासाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच जिल्हा सैनिक कार्यालयांनी हे अभियान राबविण्यासाठी मदत केली त्यांचेही त्यांनी यावेळी आभार मानले.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ.भीमसेन चवदार यांनीही जिल्हा सैनिक मंडळाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. कोल्हापूर झोनमध्ये निवृत्तीवेतन सहाय्य, योजनांची उपलब्धता व माजी सैनिकांचे सन्मानपूर्वक जीवन सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवर भर दिला. त्यांनी रेकॉर्ड्स व सेंटर बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या प्रयत्नांचे कौतुक केले व असे उपक्रम सशस्त्र व माजी सैनिक समुदायात मजबूत सेतू निर्माण करतात, असे मत व्यक्त केले. पुढील मेळावा हा डिसेंबर महिन्यात घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनिअर ग्रुप, खडकीचे कर्नल मुळचंद गुजर यांनी सैनिकांच्या पेन्शन बाबती माहिती दिली. या कार्यक्रमांची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी शहीद अग्निवीर सूरज पाटील यांच्या वडीलांना 1 लाख रुपयांचा धनादेश वितरण केला तसेच शहीद लक्ष्मण ओवूळकर यांच्या पत्नी श्रीमती शोभा ओवूळकर यांचाही सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा,वीर पत्नी, वीरमाता व त्यांचे अवलंबीत यांना सैन्यातील, सुविधा, नवीन धोरणे व त्याबाबतच्या येणा-या अडी अडचणींचे निराकरण या उपक्रमांत करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त झालेले अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा,वीर पत्नी, वीरमाता मोठ्या संख्येने उपस्थित होते.




