Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जनावर व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी बंदला आजरा जनावरे व्यापाऱ्यांचा पाठिंबा

जनावरे खरेदी- विक्रीसाठी नेत असताना काही संघटना व्यापाऱ्यांना जाणून बुजून लक्ष्य करत असल्याचा आरोप




आजरा (हसन तकीलदार ) : राज्यात पुकारलेल्या जनावरे व्यापाऱ्यांच्या बंदला आजरा येथे जनावरे व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमुखाने जनावरांच्या खरेदी विक्रीचा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करीत येणाऱ्या काळात जनावरांचे व्यापारी जनावरांचा व्यापार पुढील निर्णयापर्यंत बंद ठेवण्याचे बैठकीत घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे लढ्याला यशस्वी करण्यासाठी संघटित होऊन संघटना तयार करून सनदशीरपणे लढा देण्याचे ठरले.

     


आजरा तालुक्यातील तसेच आसपासच्या तालुक्यातील शेतीव्यवसाय सांभाळत जनवरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची आजरा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वागत व प्रास्ताविक भाजप अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष समीर चांद यांनी केले. या ठिकाणी सर्वांनी आपली मनोगत व व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. अधिकृत परवानगी असणारी जनावरे खरेदी विक्रीसाठी नेत असतानादेखील बाहेरच्या तालुक्यामध्ये काही संघटना या व्यापाऱ्यांना जाणून बुजून लक्ष्य करतात. पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देत दबाव आणत कोणताही पुरावा नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केले जात आहे. कायद्याने मान्यताप्राप्त जनावरे आणली तरी नाहक त्रास होत आहे असे याठिकाणी सांगण्यात आले.



यावेळी नंदकुमार नारायण देसाई म्हणाले,  मी आज शेतकरी म्हणून काम करतो आणि जोडधंदा म्हणून जनवरांचा धंदा करतो दुभत्या म्हशी, शेतीकामासाठी लागणारी बैलजोडी यांची खरेदी विक्री करतो. परंतु ज्यावेळी अशी जनावरे गाडीतून घेऊन जातो त्यावेळी जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा आरोप करून पोलिसांच्या ताब्यात देऊन मारहाण करून पैसे काढून घेऊन गुन्हे दाखल केले जातात. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघटित होऊन लढा देणे गरजेचे आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

  


गणपती शिंदे म्हणाले की, भाकड व वांझ जनावरे यांचं शेतकऱ्यांनी करायचं काय? अशी जनावरे बाळगणे शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. एकतर सरकारने ही जनावरे खरेदी करावीत नाहीतर आम्हाला खरेदी विक्री करण्यास रोखू नये, अशी मागणी केली.


ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख समीर चांद म्हणाले, जनावरांची वाहतूक करणाऱ्या गाडी मालकाची वाहने व साहित्य जप्त होत असल्याने वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांचे नुकसान होत आहे. एक ते दीड वर्षे वाहने पोलीस स्टेशनमध्ये पडून राहतात, जी जनावरे अधिकृत आहेत ज्यांची खरेदी विक्री करण्यास परवानगी आहे ती तरी खरेदी विक्री करू द्या, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन 100 टक्के बंद ठेऊन उपजिविकेसाठी तात्पुरते दुसरे पर्याय निवडा थोडं संयम ठेवा इतर जिल्ह्यातसुद्धा शेतकरी सरकारच्या या धोरणाविरोधात आवाज उठवत आहेत, असे आवाहन त्यांनी केले.  यावेळी आयुब खेडेकर, दिलावर पटेल, मेहताब आगा,शांताराम गुरव यांनीही आपली मनोगत व्यक्त करीत आपल्या व्यथा मांडल्या. 



जनवारांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद ठेऊन संघटना तयार करून पूर्ण ताकतीने कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा देण्याचे एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी असिफ दरवाजकर, खुदबुद्दीन तगारे, महमदहनीफ नेसरीकर, महादेव बोलके, नाझिम पटेल, इरफान पिरखान, खलील बेपारी, नजीर वाडीकर,मोहसीन शिकलगार आदिसह वाहतूकदार व जनावरे व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.