मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर यांचे आवाहन
गडहिंग्लजला जागृती हायस्कूलमध्ये रस्ता सुरक्षा अभियान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शहरातील जागृती हायस्कूलमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर, ओमकार मोटर ड्राइविंग स्कूल व पारस मोटर ड्राइविंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत 'शंभर दिवस शंभर शाळा' या जागरूकता मोहिमेत रस्ता सुरक्षा अभियान पार पडले. कोल्हापूरचे मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर श्रीमती रत्ना जाधव प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे होते.
स्वागत व प्रास्ताविक क्रीडाशिक्षक संपत सावंत यांनी केले. अधिकारी संदीप गडकर यांनी वाहतुकीचे नियम काटेकोर पाळले, वेळेचे योग्य नियोजन केले आणि प्रवासात सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघात टाळता येतात असा संदेश यावेळी शालेय विद्यार्थ्यांना दिला. पुढे सुरक्षित प्रवासाचे सूत्र सांगताना म्हणाले, वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करा, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा,वेग मर्यादेचे पालन करा, मोबाईलचा वापर वाहन चालविताना टाळा याविषयी सखोल माहिती दिली.
सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्रीमती रत्ना जाधव म्हणाल्या, वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या अमर्याद झाली आहे. प्रत्येकाचे जीवन अमूल्य आहे त्याची काळजी घेऊन वाहन सुरक्षित चालविले तर प्रत्येकाचे जीवन सुरक्षित राहते. रस्ता सुरक्षिततेचे काटेकोर नियम, वाहतुकीची शिस्त आणि अपघात टाळण्याचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रमेश होडगे यांनी जिथे फूटपात नसेल तर रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे असे सांगितले. श्रीरंग तांबे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इराप्पा मरडी यांनी तर दशरथ वरोटे यांनी आभार मानले. यावेळी उपमुख्याध्यापक बी.जी. कुंभार , अर्जुन मगदूम, कृष्णा देसाई, अनिल मसाळे, महंतेश दड्डी, सौ. कल्पना शिंदे यांच्यासह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपत सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.





