Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायती बंद ठेवू, शासनाला जागे करू : कामगार नेते बाळेश नाईक

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रश्नी सरकारला इशारा 


महागाव येथे गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा 


८ ऑगस्टचा कोल्हापुरातील मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या न्याय मागण्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून सतत शासन दरबारी विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहेत. मात्र त्यांच्या या मागण्यांकडे शासन डोळेझाक करत आहे. त्यामुळे शासनाने आता या कर्मचाऱ्यांची दखल न घेतल्यास यापुढे ग्रामपंचायत कार्यालये बंद ठेवून आम्हाला शासनाला जागे करावे लागेल असा इशारा कामगार नेते बाळेश नाईक यांनी दिला.



ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते मिळावेत यासह विविध मागण्यांसाठी दिनांक ८ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर धरणे, मोर्चा, उपोषण आदी आंदोलने करण्यात येणार आहेत. या राज्यव्यापी आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी या आंदोलनाला ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटना नेत्यांचे हात बळकट करावेत असे आवाहन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सरचिटणीस बबन पाटील होते. या आंदोलनात तिन्ही तालुक्यातून मोठ्या संख्येने सहभाग होण्याचा निर्धार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केला.



यावेळी बोलताना ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सम्राट मोरे म्हणाले, मे महिन्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केलेल्या धरणे आंदोलनावेळी ग्रामविकास मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अडीच महिने उलटले तरी केलेली नाही. त्यामुळे येत्या ८ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हा परिषदांसमोर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी विभागीय कार्यालयांवर आंदोलने होणार आहेत.  या आंदोलनानंतरही शासनाला जाग न आल्यास ८ सप्टेंबर पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड बबन पाटील, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे यांनीही आपल्या भाषणात कर्मचाऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.



मेळाव्याला महागावचे सरपंच प्रशांत शिंदे, संघटनेचे राधानगरी तालुका सरचिटणीस दीपक कांबळे, अध्यक्ष रोहित भंडारे, आजरा तालुकाध्यक्ष अशोक गेंगे, चंदगड तालुकाध्यक्ष परशराम जाधव, भुदरगड तालुकाध्यक्ष अनिल जकिनकरी यांच्यासह  गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप परीट यांनी केले.



महागाव ग्रामपंचायतीचा आदर्शवत कारभार; सरपंच प्रशांत शिंदे यांचा येथोचित गौरव 



राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या न्याय मागण्यासाठी संघर्ष करीत आहेत. शासन त्यांच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आहे. मात्र याला अपवाद महागाव ग्रामपंचायत आहे. कारण येथील सरपंच प्रशांत शिंदे यांनी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन व त्यांचे विविध देणे वेळेत देऊन कर्मचाऱ्यांना दिलेला दिलासा निश्चितच राज्यात आदर्शवत आहे, असा उल्लेख कामगार नेते बाळेश नाईक यांनी करत सरपंच शिंदे यांचा यथोचित सन्मान केला. त्यामुळे महागाव ग्रामपंचायतीच्या या आदर्शवत कारभाराबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.