मनसेची गडहिंग्लज एसटी आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): उत्तूर, होन्याळी, महागोंड, वझरे मार्गावर धावणारी सकाळची ९.३० ची बस सध्या बंद करण्यात आली आहे. ती पूर्ववत सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमार्फत आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, सध्या शेतकरीवर्गाची शेतीकामांची कामे सुरू असून उत्तूरकडे जाणारा शेतकरीवर्ग खूप मोठा आहे. त्याचबरोबर दहावी-बारावीबरोबरच सर्व विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालये व इतर संगणक प्रशिक्षणाचे वर्ग सुरु झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थीवर्ग उत्तूरसह गडहिंग्लजकडे मोठ्या प्रमाणावर येतो. त्याचबरोबर रुग्ण, वयोवृद्ध यांचीदेखील वारंवार ये-जा सुरू असते. मात्र गावामधून सकाळी साडेनऊ वाजता बस नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे उत्तूर, होन्याळी, महागोंड, वझरे जाणारी सकाळी ९.३० ची बस पूर्वीप्रमाणे सुरू करावी, अशी मागणी केली आहे. पूर्वी ही बस गडहिंग्लज आगाराची होती. त्यामुळे गडहिंग्लज आगाराने ही बस सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणीही होत आहे. ही गाडी पूर्ववत सुरु न केल्यास विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनावर मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे, शिवराज लोखंडे, विशाल ससाणे, मनीष पाटील, प्रकाश लोखंडे, गणेश पाध्ये, विश्वजित भाईगडे यांच्या सह्या आहे.

