गडहिंग्लजला ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरण च्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील विद्युत पुरवठा सोमवार ऐवजी अन्य दिवशी खंडित करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनातून केली आहे. सदर निवेदन कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
महावितरणकडून दर सोमवारी विद्युत पुरवठा बंद ठेवला जातो. याचा नागरीकांना नाहक त्रास होत आहे. सध्या ७ ऐवजी ५ दिवसाचा आठवडा झाला आहे. त्यामुळे शासकिय कार्यालये, बँका अन्य संस्था शुक्रवारी बंद झाल्या की थेट सोमवारी सुरू होतात, पण सोमवारी विद्युत पुरवठा खंडीत असल्याने सोमवारीही शासकिय कार्यालयातील कामे ठप्प असतात. त्यामुळे चार दिवसांचा आठवडा अशी परिस्थिती सध्या आहे. गडहिंग्लज शहरात तालुक्यातील शंभरहून अधिक गावातील नागरीकांचा संपर्क असून दर सोमवारी विविध कार्यालयात गर्दी असते. आठवडयाच्या पहिल्या दिवशी अधिकारी हजर असतात पण वीज पुरवठा नसतो, त्यामुळे पुन्हा सर्व्हर डॉऊन, नेटवर्क अशा समस्या येत आहेत. वीज बंद असल्याने कोणतेही काम होत नसल्याने कामे खोळंबतात परिणामी नागरिकांना तालुक्याला हेलपाटे मारण्याची वेळ येते.
मंगळवारी गडहिंग्लजची बाजारपेठ बंद असते. सोमवारी वीज बंद आणि मंगळवारी बाजरपेठ बंद याचा फटका व्यापाऱ्यांसह नागरीकांना बसतो. ग्रामीण भागातील समस्या तर वेगळ्याच आहेत. सोमवारी वीज नसल्याने काम ठप्प होतात. नागरीकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. ज्येष्ठ नागरीकांचे हाल होतात. वीज पुरवठा बंद असल्यामुळे आवश्यक असलेली कागदपत्रे, झेरॉक्स, टायपिंग यासाठी जादा दर लावला जातो. सर्वसामान्य नागरीकांना आर्थिक भुर्दंड पडतो. याशिवाय अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. याचा गांभिर्याने विचार करून महावितरण कंपनीने सोमवारी वीज पुरवठा खंडीत करण्याऐवजी अन्य दिवशी वीज पुरवठा बंद करावा. अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाप्रमुख अजित खोत, युवराज पोवार, श्रीशैलाप्पा साखरे, शहर प्रमुख प्रकाश रावळ, तालुकाप्रमुख वसंत नाईक, सुधाकर जगताप, संपर्क संघटक मारुती जाधव, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, संभाजी येडूरकर, सोशल मीडिया समन्वयक संकेत रावण, शाखाप्रमुख तुकाराम वाघराळकर, विशाल कांबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


