Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कष्टाची, जिद्दीची कमाल; गडहिंग्लजच्या ऋतुराजची राज्यात धमाल

इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौथा




गडहिंग्लज (प्रतिनिधी ): घर खापरीचे... छोटसं घर... पाठीवर गरिबीचे चटके... वडील दिवसभर उन्हात सेंट्रिंगच्या कामावर... आई मोजमजुरी करून संसाराचा गाडा ओढणारी... अठरा विश्व दारिद्र्याच्या परिस्थितीत वाढलेल्या गडहिंग्लजच्या ऋतुराज प्रकाश येजरे यांने आपल्या कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीधारक ठरला. तसेच उतुंग तेज फाउंडेशनच्या "मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे" या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक स्पर्धेतही उल्लेखनीय यश मिळवत गुजरात मधील अहमदाबाद येथे आयआयटी आणि सायन्स सेंटर मध्ये शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली. 



ऋतुराजच्या घरात संपत्ती नाही; पण स्वप्नांची श्रीमंती आहे. वडील प्रकाश रोजंदारीवर सेंट्रींगचे काम तर आई मनीषा मोजमजुरी करून संसाराला हातभार लावते. मोठी बहीण श्रुती बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. त्यांने प्रतिकूल परिस्थितीला दोष न देता पहाटेचा अंधार सरण्यापूर्वी अभ्यासाला सुरुवात आणि रात्री बारा वाजेपर्यंत पुस्तकांशी मैत्री हेच त्याचे रोजचे आयुष्य. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून तो सध्या जागृती हायस्कूल गडहिंग्लज येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे. 


विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी त्याच्या जिद्दीचे कौतुक करत या होतकरू ऋतुराजच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली आहे. गरिबी माणसाची स्वप्ने हिरावून घेऊ शकत नाही; उलट स्वप्नांना अधिक बळ देते. कष्ट, चिकाटी, जिद्द आणि शिक्षणावर असलेली निष्ठा यांच्या बळावर त्यांनी यशाचा दीप प्रज्वलित केला आहे. त्याची वाटचाल अनेक होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.