Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा नगरपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेची सूचना प्रसारमाध्यमांद्वारे जाहीर करण्याची मागणी



आजरा (प्रतिनिधी ): आजरा नगरपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेची सूचना स्थानिक वृत्तपत्रे, दूरदर्शन तसेच मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वेळेवर देण्यात यावी, जेणेकरून ते सभेला उपस्थित राहून नगरपंचायतीच्या कामकाजाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवू शकतील, अशी मागणी लोकनियुक्त नगरसेवक व नगरसेविकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायतीच्या मासिक सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. तसेच विविध विकासकामांना मंजुरी, आर्थिक तरतुदी व जनहिताचे अनेक विषय सभेत निकाली काढले जातात. या निर्णयांची अचूक व अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.


लोकशाही व्यवस्थेत प्रसारमाध्यमे ही नागरिक व प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, माध्यमांच्या उपस्थितीमुळे नगरपंचायतीच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येते. नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास वाढतो तसेच विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


त्यामुळे नगरपंचायतीच्या प्रत्येक मासिक सर्वसाधारण सभेची सूचना नियमानुसार स्थानिक वृत्तपत्रे, दूरदर्शन वाहिन्या व मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वेळेवर देण्यात यावी आणि त्यांना सभेला उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



हे निवेदन उपनगराध्यक्ष सौ. अश्विनी डोंगरे, नगरसेवक परशुराम बामणे, नगरसेवक परेश पोतदार. नगरसेविका डॉ. सौ. स्मिता कुंभार, नगरसेविका सौ. आसावरी खेडेकर, नगरसेविका श्रीमती कलावती कांबळे, नगरसेविका सौ. रेश्मा बुढेखान, नगरसेविका सौ. अन्वी केसरकर, नगरसेविका सौ. निशात समीर चाॅंद  यांच्या स्वाक्षरीने मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत यांना सादर करण्यात आले आहे.


निवेदनाचा सकारात्मक विचार करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.