प्रा. प्रकाश इंगळे यांचा सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ उत्साहात संपन्न
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): "शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून समाज परिवर्तनाचा शिल्पकार असतो. संघर्षातून उभे राहून संस्थेच्या, गावाच्या विकासासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या प्रा. प्रकाश इंगळे यांचे कार्य पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे".असे गौरवोद्गार सदाशिव मंडलिक महाविद्यालय मुरगुडचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे यांनी हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित व्होकेशनल विभागाचे प्रा. प्रकाश इंगळे यांच्या ३२ वर्षाच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेनंतर संत अँथोनी चर्च, गडहिंग्लज येथे आयोजित सेवानिवृत्ती सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साधना शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव, माजी प्राचार्य जे.बी. बारदेस्कर होते.
रोपास जलार्पण व कु. आर्या लोहार हिच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत पृथ्वीराज इंगळे व दशरथ राऊत यांनी केले. बाळेश नाईक यांनी प्रास्ताविकेतून प्रा. इंगळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे यांच्या हस्ते गौरव अंकाचे प्रकाशन झाले. मानपत्राचे वाचन दत्ता देशपांडे यांनी केले. प्रा. प्रकाश इंगळे यांचा सपत्नीक सत्कार जे. बी. बारदेस्कर व प्रा. स्वाती कोरी यांच्या शुभहस्ते झाला.
पुढे बोलताना डॉ. शिवाजीराव होडगे म्हणाले," प्रा. प्रकाश इंगळे यांचे व्यक्तिमत्व संघर्षातून घडले आहे. सेवाभावी वृत्ती आणि संस्थेच्या प्रगतीसाठीचे त्यांचे सातत्यपूर्ण योगदान उल्लेखनीय आहे. समाजाभिमुख विचार, प्रामाणिक कार्यपद्धती आणि शिक्षण क्षेत्रावरील अखंड निष्ठा हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे." असे सांगितले. प्रा. पी. डी. पाटील, प्रा. स्वाती कोरी, कुमारी हेमलता इंगळे, भीमराव पाटील, प्रा. सुशांत मगदूम,एस.टी. कुराडे, किशोर देसाई, आर.एस. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. सत्कारमूर्ती प्रा. प्रकाश इंगळे यांनी शिक्षक म्हणून मिळालेला सन्मान हीच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असल्याची भावना व्यक्त केली. जे. बी. बारदेस्कर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
यावेळी नागेंद्र मुंगुरवाडी,सौ. दिपाली कांबळे, बी.डी.बिरंजे, तानाजी कुराडे, पी.बी. नांदवडेकर, शिवाजी कुराडे, पी.ए.देसाई, बाळकृष्ण पाटील, सौ. मीनाक्षी झळके, अरविंद बारदेस्कर, बाबासाहेब पाटील,राजन देसाई, संतोष पवारं,दिलीप देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सावंत यांनी तर आभार संजय बिरंजे यांनी मानले.




