विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप; परिसरात वृक्षारोपण उपक्रम
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडहिंग्लज तालुक्यातील हरळी खुर्द येथे सामाजिक भान जपणारा उपक्रम राबवण्यात आला. येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे व फळांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळा परिसरात वृक्षारोपण करून आमदारांचा वाढदिवस उत्साहात व सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्यासह पौष्टिक फळांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
सामाजिक भान जपणारा उपक्रम!
आमदारांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता विद्यार्थ्यांना थेट शैक्षणिक मदत आणि शाळा परिसरात झाडे लावून पर्यावरणरक्षणाचा दिलेला संदेश हा सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, विस्तार अधिकारी राजन दड्डीकर, ग्राम महसूल अधिकारी नागोराव मोरे, पोलीस पाटील चंद्रकांत कुंभार, ग्रामपंचायत अधिकारी संदीप आदमापुरे, सरपंच साधना आयवाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय आयवळे, उपसरपंच शशिकांत चौगुले, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन भैरू मांगले, विद्या मंदिर हरळी खुर्दचे मुख्याध्यापक अनिल बागडी, शिक्षिका रेखा पाटील, संदीप बाबर, गौरी पालकर, प्राजक्ता पत्ताडे, हरळी खुर्द येथील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन नेटके झाल्याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.


