ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी
कोल्हापूर : आदमापूर येथील श्री. बाळूमामा देवस्थानच्या गेल्या वीस वर्षातील संपूर्ण आर्थिक व्यवहारांची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील श्री. बाळूमामा देवस्थानच्या बकरी विक्री व जमिनी खरेदीमध्ये मोठया प्रमाणावर झालेला गैरप्रकार नुकताच उघड झाला आहे. या गैरप्रकारामुळे भाविकांच्या भावनाना धक्का पोहचला आहे. या प्रकाराबाबत जनतेतून तीव्र संताप व्यक्त होताना दिसतो. बकरी विक्री प्रकरणात सुमारे ७० कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. केवळ एका प्रकरणातून झालेला घोटाळा उघड झाला असला तरी संपूर्ण देवस्थानच्या कारभाराची खास चौकशी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अर्थिक गैरव्यवहार उघड होतील. गेल्या वीस वर्षातील या देवस्थानच्या संपूर्ण व्यवहारांची चौकशी झाल्यास त्यातून मोठया प्रमाणावर गैरप्रकार उघड होतील असा जाणकाराचा अंदाज आहे. यामुळे भाविक वर्ग संतप्त झाला असून जनतेतूनही याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यासाठी आपण हा विषय गांभिर्याने घेवून तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत.
दरम्यान या देवस्थानचा कारभार प्रशासक अथवा प्रशासक मंडळाकडे द्यावा. गैरव्यवहाराला जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे. आमच्या पक्षाने याविषयात गांभिर्याने लक्ष घातले आहे. आपण तत्काळ चौकशीचा आदेश द्यावा आणि सखोल चौकशी करून कारवाई करावी. १० ऑगस्ट पर्यंत आपण काय कार्यवाही केली याबाबतची माहिती जनतेसाठी जाहिर करावी. याबाबत दूर्लक्ष झाल्यास पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर जिल्हा प्रमुख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, कृष्णा डाकरे, तालुका संघटक बचाराम गुरव, जिल्हा संघटीका विमल पाटील, जिल्हा ग्राहक संरक्षण संघटक जयवंत वायदंडे, तालुका संघटिका मेरी डिसोजा, तालुका संघटिका रूपाली देसाई, माजी तालुकाप्रमुख सुरेश पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी प्रसाद पिलारे, उपतालुकाप्रमुख अशोक पाटील, थॉमस डिसोजा, संतोष कोटकर, अशोक दाभोळे, युवासेना शहरप्रमुख वरदराज पाटील आदींच्या सह्या आहेत.

