Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

औरनाळ येथे 'गुरुपौर्णिमा' भक्तीभावात संपन्न, पाच हजाराहून अधिक भाविकांनी घेतला ब्रह्मानंदाचा अनुभव



गडहिंग्लज (संपत सावंत): श्री सद्गुरु बाळूमामा शक्तीस्थान, औरनाळ येथे गुरुपौर्णिमा अत्यंत भक्तिमय,उत्साहपूर्ण आणि अध्यात्मिक वातावरणात पार पडली. या सोहळ्याचे हे सोळावे वर्ष होते. तीन दिवस चाललेल्या विविध धार्मिक, अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाहून निघाला होता. पाच हजारापेक्षा अधिक भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेत ब्रह्मानंद सोहळ्याचा अनुभव घेतला.


ब्रम्हांडनायक श्री सद्गुरु बाळूमामा यांचा फोटो व त्यांच्या पवित्र कपड्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. श्री ज्ञानेश्वरी व विजय ग्रंथाचे सामूहिक वाचन मोठ्या श्रद्धाभावानी झाले. भाविकांनी या धार्मिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.औरनाळ, शेंद्री येथून आंबील घागरी व पादुकांच्या मिरवणुकीने वातावरण भक्तीमय झाले. टाळ-मृदंग, लेझीम, हलगी वाद्यांच्या गजरात व "बाळूमामांच्या नावानं चांगभलं" च्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमून गेला.



ह.भ. प. भिकाजी मगदूम महाराज, ह. भ. प. बाळकृष्ण परीट महाराज,ह.भ. प. पुंडलिक गवळी महाराज, ह.भ. प. नानासो पाटील महाराज यांनी प्रवचनातून सद्गुरु भक्ती, अध्यात्म आणि संस्काराचे महत्त्व पटवून दिले. करवीरचे ह.भ. प. मारुती लवटे व ह.भ. प. शिवनाथ योगी महाराज यांच्या कीर्तन सेवेमुळे भाविक मंत्रमुग्ध झाले. शाहीर मारुती केसरकर यांच्या बाळूमामांच्या भक्ती गीताने व पंडेवाडी (ता. राधानगरी) यांच्या बहारदार सोंगी भजनाने उपस्थित भाविकांची मने जिंकली.बोंजुर्डीच्या विठ्ठल- रुक्मिणी भजनी मंडळाच्या हरिपाठाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी सहभाग घेत अखंड नामस्मरणाचा जागर केला.



काल्याच्या कीर्तनाने भक्तीमय सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीऔरनाळ, शेंद्री, हनिमनाळ येथील ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक आणि असंख्य स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.