कै. शिवुताई व कै. बंडू सुभाणा नाईक यांच्या स्मरणार्थ आयोजन
शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने सहभागाचे आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): भारतीय संस्कृती आणि कृषी परंपरेचा अनमोल ठेवा असलेल्या बेंदूर सणाचे औचित्य साधून पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्या मातोश्री कै. शिवुताई व वडील कै. बंडू सुभाणा नाईक यांच्या स्मरणार्थ बसर्गे बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथे भव्य 'तालुकास्तरीय सुदृढ बैलजोडी स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, २७ जुलै रोजी रंगणाऱ्या या सोहळ्याचे हे २० वे वर्धापन वर्ष असून, ग्रामपंचायत, स्थानिक संस्था, ग्रामस्थ व तरुण मंडळांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य कृषी उत्सव पार पडणार आहे.
सदर स्पर्धा सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रंगणार असून गडहिंग्लज तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी आपल्या देखण्या व सुदृढ बैलजोड्यांसह यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
विविध ४ गटांत रंगणार सामना
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि स्पर्धा निकोप वातावरणात पार पडण्यासाठी कमिटीने चार गटांत विभागणी केली आहे. बिनदाती गट, दोन दाती गट, चार ते सहा दाती गट, सर्वसाधारण बैलजोडी गट (खुला) असे गट आहेत.
भरघोस बक्षिसे आणि सन्मान
प्रत्येक गटातील पहिल्या चार विजेत्यांना रोख रक्कम, ढाल आणि मानाचे निशाण देऊन गौरवले जाणार आहे. प्रथम क्रमांक: ₹ १०,००१/- (ढाल व निशाण), द्वितीय क्रमांक: ₹ ७,००१/- (ढाल व निशाण), तृतीय क्रमांक: ₹ ५,००१/- (ढाल व निशाण), चतुर्थ क्रमांक: ₹ २,०५१/- (ढाल व निशाण)
विजेत्यांना कै. शिवुताई व कै. बंडू सुभाणा नाईक यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह (ढाल), तर कमिटीतर्फे मानाचा फेटा, श्रीफळ, पानविडा आणि निशाण देऊन विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रवेश नोंदणी व संपर्क
प्रवेश शुल्क ₹ ७५१/ (प्रति जोडी) आहे. गडहिंग्लज तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांची वेळेत नोंदणी करून या पारंपरिक सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन सुदृढ बैलजोडी स्पर्धा कमिटी व समस्त ग्रामस्थ, बसर्गे बुद्रुक यांनी केले आहे.


