महात्मा फुले विद्यालयात जीएस, एलआर व सीआर पदांसाठी पार पडली चुरस
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ना मतदानाचे वय... ना निवडणूक प्रक्रियेचा आधीचा अनुभव... तरीही निवडणूक आयोगाच्या धर्तीवर पार पडलेल्या हायटेक मतदानाने महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा आगळावेगळा आणि अभूतपूर्व अनुभव घेतला. मोबाईल ईव्हीएम (EVM) ॲपच्या माध्यमातून शालेय निवडणुका पार पाडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाहीचे धडे देण्याच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पालकवर्ग व परिसरातून जोरदार कौतुक होत आहे.
शालेय स्तरावर लोकशाहीचे महत्त्व आणि मतदान प्रक्रियेचे ज्ञान व्हावे, या उद्देशाने शिक्षकांनी युट्यूबवरून मोबाईलवर EVM ॲप डाऊनलोड करून घेतले. १० मोबाईल फोनच्या साह्याने 'कंट्रोल युनिट' आणि 'बॅलेट युनिट' एकमेकांना जोडून अत्यंत पारदर्शक वातावरणात ही मतदान प्रक्रिया राबवण्यात आली.
या शालेय निवडणुकीत आचारसंहिता जाहीर करण्यापासून ते मतदार यादी निश्चित करणे, उमेदवारी अर्ज भरणे व छाननी, अर्ज मागे घेणे, चिन्ह वाटप, धडाकेबाज प्रचार, मतदान आणि शेवटी निकाल जाहीर करेपर्यंतच्या सर्व प्रक्रिया हुबेहूब मुख्य निवडणुकांसारख्या पार पडल्या.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
जनरल सेक्रेटरी (विद्यार्थी प्रतिनिधी): दीपक रेडेकर
विद्यार्थिनी प्रतिनिधी (LR): मारिया पठाण (इ. ५ वी ते ७ वी) व साक्षी आजगेकर (इ. ८ वी ते १० वी)
वर्ग प्रतिनिधी (CR - इ. ५ वी ते १० वी): आराधना पाटील, अभिरिया गोकाककर, राजवीर पाटील, श्वेताली भोसले, कार्तिक पाटील, श्रेयश जेधे, दीपक पाटील, तनया जावळे, प्रतीक भालबर, महेश मरणव्होळे आणि हर्षवर्धन वाघराळीकर हे विद्यार्थी विजयी झाले.
निवडणूक अधिकारी म्हणून सुभाष सुतार यांनी, तर सेक्टर ऑफिसर म्हणून किरण पाटील, संदेश कोकीतकर व रमेश कळविकट्टे यांनी जबाबदारी सांभाळली. केंद्राध्यक्ष म्हणून अशोक नांदूलकर, कुलदिप देसाई आणि प्रथमेश शेळके यांनी काम पाहिले. इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मतदान अधिकारी आणि प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.
कार्यक्रमा दरम्यान पर्यवेक्षक मोहन कांबळे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही, मतदानाचे महत्त्व आणि आचारसंहिता या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. या यशस्वी उपक्रमासाठी संस्थाध्यक्ष शंकरराव पाटील, प्राचार्य आय. एस. पाटील, संस्था प्रतिनिधी प्रा. डी. एस. पाटील आणि आण्णासाहेब पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.




