
गडहिंग्लज : गुरुपौर्णिमेनिमित्त शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज आयोजित कार्यक्रमात बोलताना पत्रकार दत्ता देशपांडे. यावेळी नगरसेविका बिनादेवी कुराडे यांच्यासह मान्यवर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): गुरु-शिष्याची परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे महत्व जाणून घेतले पाहिजे. आपल्या जीवनाला दिशा देण्याची ताकद आपल्या गुरूंमध्ये आहे. असे हे गुरु आजच्या काळात मित्र म्हणून लाभत आहेत. अशा गुरूंच्या सानिध्यात राहून आपले जीवन समृध्द केले पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्री दत्ता देशपांडे यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालय, संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेज व कर्मवीर अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरूपौर्णिमा सोहळा संपन्न झाला.
यावेळी दत्ता देशपांडे बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम. कदम होते. नगरसेविका, संचालिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, उपप्राचार्य प्रा. टी.व्ही.चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्वागत व प्रास्ताविक डॉ. अशोक मोरमारे यांनी केले.
२१ वे शतक हे आव्हानात्मक शतक आहे. आज कलाशाखेचे महत्त्व सांगताना कलेचे कौशल्य अत्यंत महत्वाचे आहे. या कलाशाखेच्या माध्यमातून रोजगाराच्या खूप संधी आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्याला प्राधान्य दिले पाहिजे. हे कौशल्य विद्यार्थ्यांनी विकसित केले पाहिजे. २१ व्या शतकात पाठांतर कौशल्ये मागे पडत असून तंत्रज्ञानामुळे कष्ट न करता कौशल्ये मिळविण्याचे तंत्र सोपे होत आहे. त्यामुळे २१ व्या शतकात विद्यार्थी हा आळसी बनत चालला आहे. अशावेळी गुरूंची जबाबदारी वाढली आहे. गुरू आपला मित्र आहे. शिवाय आई ही सर्वश्रेष्ठ गुरू आहे. विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या व विज्ञानाच्या माध्यमातून आणि गुरूंच्या ज्ञानसंस्कारातून आपले करिअर समृद्ध करणे आवश्यक आहे. असेही पत्रकार देशपांडे यांनी स्पष्ट केले.
यावेळी कला विभाग व कर्मवीर अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी सानिका पाटील, ऋतुजा शिलेदार, अंकिता ताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात नगरसेविका, संचालिका प्रा.सौ. बिनादेवी कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा. पौर्णिमा कुराडे, डॉ.संतोष माने, डॉ.ए.जी. हारदारे, प्रा.डी.यु.जाधव, प्रा.विक्रम शिंदे, प्रा.गिरीश झुरळे यांच्यासह विद्या संकुलातील कर्मवीर अध्यापक विद्यालयाचे तसेच सिनियर व ज्युनिअरचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रंगराव हेंडगे, प्रा.मधुरा हराडे यांनी केले. तर आभार डॉ.एन.बी. इकिले यांनी मानले.
