संग्रहित छायाचित्र
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मनवाड (ता. गडहिंग्लज ) गावाच्या पश्चिमेकडील पाझर तलावात महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. लिलाताई शंकर मगदुम (वय ५५, रा. मनवाड, ता. गडहिंग्लज) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, लिलाताई शंकर मगदुम यांचा मृतदेह मनवाड गावाच्या हद्दीतील पश्चिमेकडील पाझर तलावातील धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सरपंच पांडुरंग परशराम लोखंडे यांनी तातडीने गडहिंग्लज पोलीस ठाण्यात याबाबत वर्दी दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.
या प्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मृत्यूमागील नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. सहाय्यक फौजदार पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मनवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

