Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘राह-वीर’ नागरिकांना मिळणार 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक



कोल्हापूर :  रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTI) देशातील रस्ते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी 'राह-वीर' (पूर्वीची गुड समेरिटन योजना) योजनेची घोषणा केली आहे. अपघातातील गंभीर जखमींना पहिल्या महत्त्वाच्या तासात (गोल्डन अवर) तातडीने मदत करून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे.


या योजनेंतर्गत प्रत्येक पात्र ‘राह-वीर’ व्यक्तीला 25 हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. एकाच गंभीर अपघातात एकापेक्षा अधिक नागरिकांनी मिळून एखाद्याचा जीव वाचविल्यास 25 हजार रुपयांची रक्कम संबंधित मदतगारांमध्ये समान विभागली जाईल. एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त पाच वेळा या पारितोषिकाचा लाभ घेता येईल. वर्षभरात देशभरातून निवडलेल्या 10 उत्कृष्ट ‘राह-वीर’ नागरिकांना प्रत्येकी 1 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे.


मोटार वाहन अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीला अपघातानंतरच्या पहिल्या एका तासाच्या आत जवळच्या रुग्णालयात किंवा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पोहोचवून आवश्यक वैद्यकीय उपचार मिळवून देणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकते. मोठी शस्त्रक्रिया करावी लागलेली व्यक्ती, किमान तीन दिवस रुग्णालयात दाखल असलेली व्यक्ती, मेंदू किंवा पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेली व्यक्ती किंवा उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अपघातांचा गंभीर अपघातामध्ये समावेश होतो.


मोटार वाहन कायद्याच्या कलम 134A नुसार, मदत करणाऱ्या ‘राह-वीर’ नागरिकाला त्याच्या संमतीशिवाय पोलीस किंवा कायदेशीर चौकशीसाठी त्रास दिला जाऊ नये, यासाठी कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. मदतगाराला त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तक्रार निवारण समितीकडे दाद मागता येईल. मदतगाराने दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून, ती केवळ पारितोषिकाच्या प्रक्रियेसाठी वापरली जाईल.


अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे किंवा संबंधित रुग्णालय मदत करणाऱ्या व्यक्तीची नोंद करून जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवेल. जिल्हाधिकारी अथवा जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रस्तावाची छाननी करून मंजुरी देईल. त्यानंतर पात्र मदतगाराच्या बँक खात्यात PFMS/DBT प्रणालीद्वारे पारितोषिकाची रक्कम थेट जमा करण्यात येईल.


रस्ते अपघाताच्या वेळी नागरिकांनी भीती न बाळगता मानवतेच्या भावनेतून पुढे येऊन जखमींना तातडीने मदत करावी आणि ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळवून देऊन त्यांचे प्राण वाचविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.