Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यात पूर्वकल्पना न देता काहींचे रेशन बंद; ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

गरीबांच्या तोंडचा घास हिरावू नका- तालुकाप्रमुख अजित खोत


निवेदनातून वेधले तहसीलदारांचे लक्ष 




गडहिंग्लज (प्रतिनिधी ): तालुक्यातील गोरगरीब, अल्पभूधारक शेतकरी, टपरीधारक आणि फळ-भाजी विक्रेत्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांचे रेशन अचानक बंद करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाच्या या मनमानी कारभारामुळे गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली असून, प्रशासनाने याची शहानिशा करून त्वरित रेशन पूर्ववत सुरू न केल्यास शिवसेना शैलीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुकाप्रमुख अजित खोत यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. 


गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावांतील काही गरजू लाभार्थ्यांचे रेशन धान्य शासनाकडून बंद करण्यात आले आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात शिवसेना तालुकाप्रमुख अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, याबाबत अहवाल घेऊ. ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी यावेळी दिले. 


निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ज्या व्यक्तींनी बँक कर्जासाठी किंवा व्यवसायासाठी 'आय.टी. रिटर्न' (IT Return) भरले आहे, त्यांना श्रीमंत मानून त्यांचे रेशन धान्य बंद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, वाहन खरेदीसाठी किंवा एखादा छोटा-मोठा उद्योग सुरू करण्यासाठी 'उद्यम आधार' काढताना बँका आय.टी. रिटर्नची अट घालतात. त्यामुळे व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच केवळ कागदपत्रांच्या आधारे रेशन बंद करणे हा अत्यंत अन्यायकारक आणि जुलमी निर्णय आहे. छोट्या टपरीधारकांपासून ते शेतात राबणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत ज्यांना खरोखरच या रेशन धान्याची गरज आहे, त्यांच्या तोंडचा घास शासनाने हिरावून घेतला आहे. 



‘आय.टी. रिटर्न’ म्हणजे श्रीमंती नव्हे!

स्वतःच्या डोक्यावर छप्पर उभे करण्यासाठी किंवा लहान-सहान व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज हवे असल्यास बँक आय.टी. रिटर्न मागते. टपरीवाले, फळ-भाजी विक्रेते कर्जासाठी रिटर्न भरतात म्हणजे ते श्रीमंत ठरत नाहीत! शासनाने या चुकीच्या नियमाची आणि कागदपत्रांची पुनर्रचना करावी व तालुक्यातील पीडित कुटुंबांचे त्वरित सर्वेक्षण करून त्यांना रेशन धान्य पूर्ववत सुरू करावे. अशी मागणी या निवेदनातून केली आहे. शासनाने  बाधित रेशनधारकांचे तात्काळ सर्वेक्षण करावे आणि त्यांना नियमित धान्य वाटप सुरू करावे. जर प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर संपूर्ण गडहिंग्लज तालुक्यात शिवसेना रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडेल, असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला.


निवेदनावर  तालुकाप्रमुख अजित खोत, सुधाकर जगताप, संजय पाटील, वसंत नाईक, शैलाप्पा साखरे, ॲड. स्नेहल पाटील, सुरेश हेब्बाळे, प्रकाश रावळ, मारूती जाधव, विलास येमाटे, संभाजी येडूरकर, सुहास जाधव, बाबु कुभार, शैलेश इंगवले, मनिष हावळ, तुकाराम वाघराळकर, संकेत रावण आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.