श्री धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि डॉ.अग्रवाल, पाटणे आय हॉस्पिटल, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील श्री धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि डॉ.अग्रवाल, पाटणे आय हॉस्पिटल, गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात सुमारे ११३ नेत्ररुग्णांनी आपली नेत्र तपासणी करून शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन श्री बिरेश्वर मल्टीस्टेट सोसायटीचे चेअरमन शिवकुमार संसुध्दी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. श्रीधर चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे व रुग्णांचे स्वागत केले.
यावेळी संसुध्दी म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा, तसेच अशा मोफत शिबिरांच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध करून डॉ. चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.वेळेत तपासणी व योग्य उपचार केल्यास अनेक नेत्रविकारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, त्यामुळे भागातील सर्व गरजूंनी या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. गिरीश आईवळे यांनी सर्व रुग्णांची अत्याधुनिक मशीनद्वारे नेत्र तपासणी करून आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन केले. अनेक रुग्णांना पुढील उपचारांसाठी आवश्यक सोय करण्यात आली.
या शिबिरास सुभाष पाटोळे, मोहन भोसकी, सुनील चौगुले, कुमार देसाई, सागर भोसले, रामचंद्र देसाई,अस्लम कंगनी,प्रियंका जांगनुरे,काजल कांबळे,रसिका मल्लिकार्जुन जांगनुरे यांच्यासह,नेत्ररुग्ण व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणीची संधी उपलब्ध झाल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.





