जागृती हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा कानमंत्र
गडहिंग्लज ( संपत सावंत) : व्यसनमुक्त जीवन हीच प्रभावी देशसेवा असून विद्यार्थ्यांनी गांजा, सिगारेटसह सर्व प्रकारच्या अंमली पदार्थापासून दूर राहून निरोगी व आनंदी जीवन जगावे अशी प्रतिपादन मनोविकृती चिकित्सा विभागाच्या सौ.सीमा शिरतोडे यांनी राजर्षी छ. शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालय व छ. प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) कोल्हापूर यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमात बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उमेश सावंत होते.
स्वागत व प्रास्ताविक सचिन मगदूम यांनी केले. कुमार हर्षल सुभेदार यांने विद्यार्थ्यांना सामूहिक नशा मुक्तीची शपथ दिली. पुढे बोलताना सौ. सीमा शिरतोडे म्हणाल्या, 'देश सुरक्षित व विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून व्यसनमुक्त जीवन जगणे ही सुद्धा प्रभावी देशसेवाच आहे. व्यसनामुळे व्यक्तीच्या आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होत असल्याने प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
सौ. प्राजक्ता कांबळे यांनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांची माहिती देत व्यसनमुक्ती जीवनाचे महत्त्व पटवून दिले. उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक उमेश सावंत यांनी नशेच्या आहारी जाणे हा आयुष्य उध्वस्त करणारा व जीवघेणा प्रकार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून कटाक्षाने दूर राहण्याचे आवाहन केले.
यावेळी सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गीता पाटील यांनी तर दशरथ वरोथे यांनी आभार मानले.


