Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

६० वर्षांचा वनवास आणि १० वर्षांच्या वेदनांचा अंत: 'अंनिस'च्या मध्यस्थीने ७६ वर्षीय वृद्धेची 'जटामुक्ती'!

अंधश्रद्धेने उद्ध्वस्त केला होता संसार


इंचनाळ येथील ७६ वर्षीय वृद्धेने घेतला मोकळा श्वास




गडहिंग्लज (संपत सावंत ) : केसांची अस्वच्छता आणि निगा न राखल्यामुळे डोक्यावर झालेला केसांचा गुंता म्हणजेच ‘देवाची अवकृपा’ किंवा ‘देवाची बाई’ असा कपोलकल्पित गैरसमज करून घेत सासरच्या लोकांनी वाळीत टाकलेल्या ७६ वर्षीय बेबीताई रामचंद्र लोहार (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) यांची अखेर ६० वर्षांच्या मानसिक आणि शारीरिक ओझ्यातून कायमची मुक्तता झाली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रभावी प्रबोधनानंतर त्यांच्या डोक्यावरील भल्या मोठ्या जटेचे यशस्वी निर्मूलन करण्यात आले.


अंधश्रद्धेने उद्ध्वस्त केला संसार


सुमारे ६० वर्षांपूर्वी बेबीताईंचा विवाह झाला होता. विवाहानंतर आजारपणात केसांची योग्य निगा न राखल्याने त्यांच्या डोक्यावर गुंता होऊन जट निर्माण झाली. "ही देवाची बाई आहे, ही आपल्या घराचे काहीतरी वाईट करेल," या भ्रामक अंधश्रद्धेपोटी पतीने आणि सासरच्या लोकांनी त्यांना घरातून बाहेर काढले.  त्यामुळे बेबीताईंचे संपूर्ण आयुष्य माहेरी अंधकारमय झाले.


१० वर्षांचा तीव्र शारीरिक त्रास


यापूर्वी १० वर्षांपूर्वी 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांनी त्यांची जट काढली होती. मात्र, वाढत्या वयात पुन्हा केसांची निगा न राखल्यामुळे गेल्या १० वर्षांत त्यांच्या डोक्यावर पुन्हा प्रचंड मोठ्या जटेचा गुंता तयार झाला होता. यामुळे तीव्र मानदुखी, पाठदुखी आणि अंगाखाली जट येत असल्याने नीट झोपताही न येणे, अशा वेदना त्या सहन करत होत्या.


प्रबोधनाची कात्री अन् जटामुक्ती!


या त्रासाची माहिती मिळताच अंनिसचे गडहिंग्लज कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, तुकाराम कोलेकर महाविद्यालय नेसरीचे एनएसएस प्रमुख प्रा. डॉ. माधव भोसले आणि क्रीडा शिक्षक संपत सावंत यांनी इंचनाळ येथे भेट दिली. त्यांनी प्रथम कुटुंबीयांसह बेबीताईंचे प्रबोधन करून त्यांच्या मनातील भीती व अंधश्रद्धा दूर केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यावरील जट कापून त्यांची शारीरिक वेदनांतून मुक्तता केली.


या प्रसंगी शांताबाई धनाजी लोहार, सुनील धनाजी लोहार, विनायक धनाजी लोहार, नातू सुजल सुनील सुतार (मुंबई), धोंडूबाई तुकाराम इंगवले, काशवा गणपती लोहार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


जट निर्माण होणे ही कोणतीही दैवी कोपाची किंवा चमत्काराची गोष्ट नसून तो निव्वळ वैद्यकीय व अस्वच्छतेचा भाग आहे. डोक्याचे केस नियमित न धुल्यास, विंचरले न गेल्यास अथवा आजारपणात केसांची निगा न राखल्यास केसांचा गुंता होऊन जट तयार होते. योग्य प्रबोधन आणि स्वच्छतेच्या माध्यमातून जट सहज काढता येते. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.