हत्ती-कोले-षण्मुगम चषक शालेय फुटबॉल स्पर्धा : जागृतीला उपविजेतेपद
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सतरा वर्षे गटात शिवराज इंग्लीश मिडीयम स्कूल तर चौदामध्ये साधना हायस्कूलने विजेतेपद पटकाविले. त्यांनी अनुक्रमे साधना हायस्कुल, जागृती हायस्कूलचा पराभव केला. शिवराजचा आलोक पाटील, जागृतीचा आयान पटेलने स्पर्धा वीराचा बहुमान पटकाविला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत गेले तीन दिवस हत्ती-कोले- शण्मुगम चषक स्पर्धा सुरू होती. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत एकुण १८ संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे यंदाचे पंधरावे वर्ष होते.
सतरा वर्षाखालील अंतिम सामन्यात शिवराज स्कुलने साधना हायस्कूलचा ४-१ असा पराजय केला. शिवराजचा भरवशाचा आघाडीपटू आलोक पाटीलने दोन गोल करून विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला. शिवराजचा रिहान बोजगर, सिद्धार्थ हुलसारने प्रत्येकी एक गोल मारला. साधनाच्या साईश कांबळेचा गोल संघाचा पराभव टाळू शकला नाही. चौदा वर्षे गटात साधना हायस्कूलने जागृतीचा ६-० असा मोठा पराभव केला. साधनाचा सुरज पोवारने चौफेर खेळ करत गोलची हैटट्रिक करत जागृतीला नेस्तनाबूत केले. शौर्य मल्हारीने दोन, कान्ह सुतारने एक गोल करून विजेतेपद निश्चित केले.
दरम्यान, चौदा वर्षे गटाच्या दुस-या उपांत्य सामन्यात जागृतीने चिवट खेळ करत होरायझन स्कुलला टायब्रेकरवर ५-४ असे नमवून अंतिम फेरी गाठली होती. नगरसेवक अमर मांगले, सॉकरचे माजी अध्यक्ष एन. बी. अरळी, साई एज्युकेशन ग्रुपचे विश्वस्त तुषार पाटील, मुख्याध्यापक ए. बी. पाटील, श्रीपाद जोशी, गौस मकानदार यांच्याहस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. ललित शिंदे यांनी स्वागत केले. स्पर्धा समन्वयक महेश पोवार, किरण लोखंडे यांचा सत्कार झाला. यावेळी खेळाडू, प्रशिक्षक, शौकिन उपस्थित होते. मनिष कोले यांनी आभार मानले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट
स्पर्धावीर आलोक पाटील (शिवराज), आयन पटेल (जागृती)
गोलरक्षक समिन मणेर (शिवराज) कार्तिक चव्हाण (साधना)
बचावपटू सक्षम राजगीरे (साधना) रिधान खणदाळे (साधना)
मध्यरक्षक दर्शन तरवाळ (साधना), सुरज पोवार (साधना)
आघाडीपटू अनिरुध्द पांजा (शिवराज), कार्तिक देसाई (जागृती)


